

भिवंडी : संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीमध्ये ७१८ मतदान केंद्रांपैकी १५३ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ही संख्या सर्वसाधारण केंद्रांच्या तुलनेत २१ टक्के आहे. यामध्ये शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५८ केंद्रे सर्वाधिक संवेदनशील म्हणून गणली गेली आहेत. भिवंडीत निवडणूक कार्यकाळात अनेक हाणामारी, दमदाटी आणि दहशत पसरविण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडत असतात. यामुळे शहरातील काही मतदान केंद्र इमारती, मतदान केंद्र संवेदनशील मानली जातात.
१५३ मतदान केंद्र संवेदनशील
शहरातील एकूण १७३ मतदान केंद्र इमारतीमध्ये ७१८ मतदान केंद्रांचे मतदान होणार आहे. यापैकी १४६ इमारतीतील ५६५ मतदान केंद्र सर्वसाधारण, २७ इमारतीतील १५३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. संवेदनशील केंद्रांमध्ये आयटीआय इमारत, ईदगाह, हंडी कंपाऊंड, आजमी नगर, टावरे कंपाऊंड, समद नगर, नवी बस्ती, प्रभाग क्रमांक ३ इमारत, शास्त्रीनगर, भाग्यनगर, संगम पाडा, कोंबडपाडा, म्हाडा कॉलनी, बंदर मोहल्ला, भंडारी कंपाऊंड यांचा समावेश आहे.