भिवंडी : साडीच्या दुकानात साड्या ठेवण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून दोघा भावांपैकी एकाने सहकारी मित्रावर कटरने जीवघेणा हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना गोवे नाका परिसरातील एका साडीच्या होलसेल दुकानातून समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. राज किशोर जैन (१९), रिषभ किशोर जैन (२०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू पिंपळघर हद्दीतील गोवे नाका येथे कल्याण टेक्सटाइल मार्केट नावाने होलसेल साडी डेपोचे दुकान आहे. यामध्ये जखमी शहानवाज उर्फ सलमान गुड्डु शेख, राज आणि रिषभ हे तिघे काम करत आहेत. दरम्यान, २२ मे रोजी दुकानात साडी ठेवण्यावरून शहानवाज व राजमध्ये वाद झाला होता. याच वादाच्या रागातून २३ मे रोजी राज आणि किशोरने आपसात संगनमत करून शहानवाजला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर राजने दुकानातील साडी कट करण्याच्या कटरने शहानवाजच्या मानेवर हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
शहानवाज याच्यावर जखमी अवस्थेत कोनगाव येथील वेद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर या हल्ल्याप्रकरणी मॅनेजर सचिन आत्माराम इक्कर याच्या फिर्यादीवरून दोघा भावांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना २३ मे रोजी रात्री अटक केली आहे. पुढील तपास सपोनि दोडके करीत आहेत.