भिवंडी अग्निशमन यंत्रणेवर ताण; मनुष्यबळाअभावी गोदामातील आगींवर नियंत्रण मिळवताना कर्मचाऱ्यांची दमछाक

१४ लाख लोकसंख्या असलेला भिवंडी तालुका ज्यामध्ये भिवंडी शहरातील सुमारे १० लाख लोकसंख्या याचा विचार केल्यास भिवंडी शहर व ग्रामीण भागातील गोदाम भागासाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेची गरज आहे.
 भिवंडी अग्निशमन यंत्रणेवर ताण; मनुष्यबळाअभावी गोदामातील आगींवर नियंत्रण मिळवताना कर्मचाऱ्यांची दमछाक
Published on

सुमित घरत/भिवंडी

१४ लाख लोकसंख्या असलेला भिवंडी तालुका ज्यामध्ये भिवंडी शहरातील सुमारे १० लाख लोकसंख्या याचा विचार केल्यास भिवंडी शहर व ग्रामीण भागातील गोदाम भागासाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेची गरज आहे. पण भिवंडी शहर, ग्रामीणसह आसपासच्या ग्रामीण भागातील आगींच्या वर्दीवर जाण्याची जबाबदारी भिवंडी अग्निशमन यंत्रणेवर येत आहे. पण मागील कित्येक वर्षात भिवंडी अग्निशमन दलात नोकर भरती न झाल्याने अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर तारेवरची कसरत अग्निशमन दलाला करावी लागत आहे.

आगीच्या घटना व दुर्घटना काळात सर्वात प्रथम धावून जावे लागते ते अग्निशमन यंत्रणेला. भिवंडी शहर असो अथवा तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमध्ये आगीच्या घटना सतत घडत असतात. अशावेळी होणारी वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी भिवंडी पालिकेचा अग्निशमन दलातील जवान नेहमीच एक पाऊल पुढे असतो. मात्र भिवंडी पालिकेकडे यंत्र सामुग्री व वाहन सामुग्री पुरेशी आहे. पण नोकरभरती रखडल्याने मनुष्यबळाअभावी अग्निशमन दलावर अतिरिक्त ताण येत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

भिवंडी अग्निशमन दलात मागील काही वर्षात अत्याधुनिक यंत्रणेंसह वाहन दाखल झाली. पण त्याचा वापर करणारे पुरेसे मनुष्यबळ पालिकेच्या हाती नाही. शासन मान्यतेनुसार पालिका सेवेत मुख्य अग्निशामक अधिकारी, उपमुख्य अग्निशामक अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त असल्याने प्रभारी भार अधिकाऱ्यांवर सोपवला आहे.

दरम्यान भिवंडी शहरासोबत ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यांमधील आगी लागण्याच्या घटनांवेळी अग्निशमन दलाची खरी कसरत होत असते. २०२२ ते २०२४ या मागील तीन वर्षांचा आलेख पाहिल्यास शहरात ४४० तर ग्रामीण भागात याच काळात ३०५ आगीच्या घटना घडल्या. तर या तीन वर्षांच्या काळात शहरात ४७४ तर ग्रामीण भागात १०७ रेस्क्यू वर्दी केल्या आहेत.

एमएमआरडीएचे दुर्लक्ष

सुमारे ५० हजार हून अधिक गोदामे आहेत. या ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी शासनाने २००९ पासून एमएमआरडीए प्राधिकरणाकडे सोपविली आहे. परंतु या १५ वर्षांच्या काळात या भागात विकास शुल्क म्हणून कोट्यावधी रुपये जमा करणाऱ्या एमएमआरडीए प्रशासनाने या भागात अग्निशमन केंद्र उभारण्यात कधीच पुढाकार घेतला नाही.

तब्बल ३२ वाहनांचा समावेश

पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दिमतीला फायर वॉटर टॉवर १, फायर इंजिन ८, मल्टीपरपझ फायर इंजिन (फोम टेंडर) ५, वॉटर ब्राउझर ५, मिनी फायर इंजिन ७, फायर अँड रेस्क्यू व्हॅन (देवदुत व गुरखा) २, फायर जीप १, फायर बाईक ३ अशी तब्बल ३२ वाहने आहेत. या आकडेवारीवरून हेच सिद्ध होते की,भिवंडी पालिका अग्निशमन दलाकडे यंत्रणा आहे, पण चालवणार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे आज ही फायर बाईक एक वर्षांपासून वापराविना पडून आहे.

ही यंत्रणा कोलमडलेलीच

२०२१ मध्ये तत्कालीन खासदार कपिल पाटील यांनी याबाबत केलेल्या पत्रव्यवहारास उत्तर देताना एमएमआरडीएकडून ११ मे २०२१ रोजी या भागात स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारणीस प्राधिकरणाच्या ७ जुलै २०२० रोजीच्या बैठक क्रमांक १४९ व्या बैठकीत मंजुरी दिली असून, अग्निशमन दलासाठी अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे कळवले.

logo
marathi.freepressjournal.in