भिवंडी : भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला असून तिचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. खादिजा शेख (६) असे मृत मुलीचे नाव असून डॉ. उमर शेख हे गंभीर जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाड्याकडून नाशिककडे जाणारा ट्रक नदीनाका मार्गे शहरात प्रवेश करत असताना, त्याचवेळी फरीद बाग परिसरातील रहिवासी डॉ. उमर शेख आपल्या मुलीला निजामपूर येथील ‘माझरीन इंग्लिश स्कूल’ मधून घेऊन दुचाकीवरून घरी जात होते. उड्डाणपुलावर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत खादिजा दुचाकीवरून पडून थेट ट्रकच्या चाकाखाली आली. गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर विरुद्ध दिशेने फेकले गेल्यामुळे डॉ. उमर शेख गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने चालक सिराज कसुवर कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत खादिजाचा मृतदेह स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.