

भिवंडी : शहरातील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्याने तब्बल ३७ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाधित रुग्णांवर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी संबंधित हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी रात्री एका कुटुंबातील सहा सदस्यांसह १४ जणांना अचानक मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आणखी २३ जणांना अशाच प्रकारची लक्षणे दिसून आल्याने त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ३७ वर पोहोचली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी खंडूपाडा येथील 'फेमस शोरमा' या दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खरेदी करून घरी नेऊन सेवन केले होते. त्यानंतर काही तासांतच त्यांना उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखी आणि तीव्र अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रात्री उशिरा संबंधित हॉटेलची पाहणी करून विविध अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत.
याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी हॉटेल चालक दिलशाद अन्सारी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
रुग्णांची तपासणी केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अद्याप काही रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या उष्णतेची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी उघड्यावर विकल्या जाणाऱ्या किंवा शिळ्या अन्नपदार्थांचे सेवन टाळून घरगुती व सकस अन्नाला प्राधान्य द्यावे.
डॉ. माधवी पंदारे, अधीक्षिका स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय