

भिवंडी : पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून महिलेने केलेल्या मारहाणीत फळ विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मोहम्मद याकूब रुस्तुम अली सिद्दीकी (४७) असे मृत्यू झालेल्या फळ विक्रेत्याचे नाव असून, लक्ष्मीबाई नाईक (५६) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याकूब सिद्दीकी हे जुना ठाणा रोड येथे हातगाडीवर फळविक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांनी व्यवसायासाठी लक्ष्मीबाई यांच्याकडून काही पैसे उधार घेतले होते. ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास लक्ष्मीबाई पैसे मागण्यासाठी त्यांच्या हातगाडीवर आल्या. यावेळी झालेल्या वादातून त्यांनी सिद्दीकी यांना मारहाण केली. मारहाणीत ते जमिनीवर कोसळले.
याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मीबाई नाईक यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत्यूचे नेमके कारण आणि मारहाणीचा मृत्यूशी संबंध तपासण्यासाठी मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांनी दिली.