
भिवंडी : रात्रीच्या सुमारास भावाची तब्येत बिघडल्याने २२ वर्षीय विवाहिता भावाला दवाखान्यात घेऊन जाण्याकरिता रिक्षातून आली असता वासनेच्या शोधात असलेल्या ६ नराधमांनी आपसात संगनमताने विवाहितेच्या भावासह रिक्षाचालकाला मारहाण करून तिला जबरीने रिक्षातून झाडाझुडपात घेऊन जाऊन तिच्यावर जबरी अत्याचार करून तिला पुन्हा एका बोलेरो पिकअपमध्ये नेऊन पीडितेवर दोनवेळा जबरीने आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नागाव आणि फातिमानगर परिसरातून समोर आली आहे.
याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून ६ जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका नराधमास अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. सदरे उर्फ मोहम्मद साइद आलम, पाशा, लड्डु, गोलु व त्यांचे इतर २ साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. तर त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी सपोनि सुरेश चोपडे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता तिच्या भिवंडीतील आत्याच्या मुलीकडे निद्रावस्थेत असताना तिच्या १९ वर्षीय भावाची तब्येत बरी नसल्याचे माहीत पडल्यावर भावाने बहिणीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी बागे फिरदोस या ठिकाणी बोलवले. त्यानंतर पीडितेने ओळखीतील रिक्षाचालकासोबत बागे फिरदोस गाठले. त्यावेळी वासनेच्या शोधातील सहा नराधमांनी तक्रारदार विवाहितेच्या भावाला आणि रिक्षाचालकाला मारहाण करून प्रथम पीडितेला जबरीने रिक्षातून झाडाझुडपात त्यानंतर फातिमानगर येथे एका बोलेरो पिकअप टेम्पोत पीडितेवर दोनवेळा जबरी अत्याचार केला आहे.