Bhiwandi : महागाईमुळे बकरी बाजारावर मंदीचे सावट; विक्री झाली कमी

बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी खास बकरा हवा असतो, बकरी ईद म्हणजे ईद-उल-अधा हा त्यागाचा सण म्हणून मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या उत्सवात साजरा करत असतात. यंदा ७ जून रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. त्यामुळे बकरे खरेदी करण्यासाठी बकरी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र...
Bhiwandi : महागाईमुळे बकरी बाजारावर मंदीचे सावट; विक्री झाली कमी
Published on

सुमित घरत /भिवंडी

बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी खास बकरा हवा असतो, बकरी ईद म्हणजे ईद-उल-अधा हा त्यागाचा सण म्हणून मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या उत्सवात साजरा करत असतात. यंदा ७ जून रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. त्यामुळे बकरे खरेदी करण्यासाठी बकरी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र यंदा महागाई आणि पावसामुळे भिवंडीतील बकरी बाजारात बकरे खरेदी करण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बकरी बाजार भिवंडी तालुक्यातील कोनगाव, तरीपाडा या भागात भरत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आठवड्यातून तीन दिवस बारामाही बकरी बाजार भरतो. त्यातच दरवर्षी बकरी ईद निमित्ताने हा बाजार महिन्याआधीपासून सुरू होतो. हा बकरी बाजार संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवसात भरणाऱ्या या बकरी बाजारात यंदा बकरी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी आले आहेत. मात्र गेल्या २० दिवसांपासून महागाईमुळे बाजारात मंदीचे सावट असल्याने खूपच कमी प्रमाणात बकरे विक्री झाल्याची खंत एका बकरा व्यापाऱ्याने व्यक्त केली.

आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवसात भरणाऱ्या या बकरी बाजारात गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी येत असतात. तर दुसऱ्या दिवशीच्या मटण विक्रीसाठी अनेक मटण विक्रेते, खाटीक या ठिकाणी बकरे खरेदीसाठी येत असतात.

ग्रामीण भागात मार्च ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर लग्नसराई होत असल्यामुळे हळदी सभारंभात मटणाचा बेत सगळीकडे आखला जातो. त्यामुळे या दिवसातही बकऱ्यांच्या किमती १० ते ३० हजारापर्यत पोहचत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी मांडले. मात्र यंदाच्या बकरी ईद सणावर पावसाचे सावट असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे पर राज्यातील व्यापारी ट्रक - टेम्पोने हजारो किलोमीटरचा प्रवास करून या बकरी बाजारात दाखल होत असतात. त्यामुळे चांगल्या कमाईची आशा असणाऱ्या व्यापाऱ्यांना मात्र परतीच्या प्रवासाचे भाडे जमवणे देखील अडचणीचे ठरत असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पांढऱ्या शुभ्र बकऱ्याला अधिक मागणी

बकरी ईद सणाला पांढऱ्या शुभ्र बकऱ्याला अधिक मागणी असल्याने हे बकरे २५ हजारापासून ते ९० हजारपर्यंत विकले जातात. मात्र बाजारात बकऱ्यांच्या किमती अधिक असूनही मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पर राज्यातील व्यापारी कोनगाव बकरी बाजारात बकऱ्यांना उघड्यावरच बांधून ठेवत असल्याने पावसामुळे ते आजारी पडत असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जोधपूर, राजस्थान येथून बकरे विक्रीसाठी बाजारात आले आहेत. परंतु पावसामुळे खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे. बकरे उघड्यावर बांधल्याने त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. तसेच पावसामुळे अनेक बकऱ्यांची तब्येत खालावली असल्याने बोकड विक्री करताना भावही कमी मिळत आहे. त्यामुळे यावेळी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. - सद्दाम शेख, बकरे विक्रेता, (व्यापारी)

logo
marathi.freepressjournal.in