मस्तच! भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर एकत्रित परिवहन बससेवेला 'ग्रीन सिग्नल'; शासन निर्णयही काढला

राज्य शासनाच्या नगरविकास एकत्रित परिवहन प्राधिकरणाची बससेवा सुरू करण्यास मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णयही काढला आहे.
मस्तच! भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर एकत्रित परिवहन बससेवेला 'ग्रीन सिग्नल'; शासन निर्णयही काढला

बदलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरकरांना असलेली शहरांतर्गत बससेवेची प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर यांच्या एकत्रित परिवहन प्राधिकरणाची बससेवा सुरू करण्यास मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णयही काढला आहे. त्यानंतर आता लवकरच ही परिवहन सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद या नगरपरिषदांच्या परिक्षेत्रातील २२५ चौरस किलोमीटर परिघ क्षेत्रात सन २०११ जनगणनेनुसार ३३.४३ लक्ष इतकी लोकसंख्या आहे. सदर परिक्षेत्रामध्ये खासगी वाहने, तसेच इतर खासगी वाहनांची संख्या वाढत असून, त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूककोंडी व प्रदूषणात वाढ होत आहे. परीक्षेत्रामध्ये १२ रेल्वे स्थानके असून, या स्थानकांवरून दररोज लाखो लोक प्रवास करतात तसेच, या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या हद्दीत व नजिकच्या सुमारे १० कि.मी. परिक्षेत्रात ग्रामीण भागाचे शहरसदृश नागरी भागात रूपांतर झालेले आहे. त्यात खासगी वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतूककोंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याकरिता नागरिकांना प्रवृत्त करणे तसेच शहरातील पर्यावरण समतोल राखणे आणि इंधन बचत-वाहतूककोंडी नियंत्रण हा उद्देश ठेवून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या एकत्रित सहभागातून सदर क्षेत्राकरिता प्राधिकरण तयार करून त्याद्वारे सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार शासनाने "कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित" (कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांचा संयुक्त उपक्रम) या अभिनामाची कंपनी स्थापन करण्यास व त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यासाठी मान्यता दिली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातला शासन निर्णयही काढला आहे. त्यामुळे लवकरच बदलापूरकरांचे बससेवेचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकसंख्येवर आधारित बसेसचे नियोजन

परिवहन मार्गावरील कर्मचारीवर्ग बाह्य यंत्रणेद्वारे आणि प्रशासकीय कर्मचारी वर्ग संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रतिनियुक्तीवर वर्ग केला जाणार आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील मालमत्ता वाहतुकीच्या प्रयोजनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मालमत्तेचे विनियोजन, नियोजन कंपनीमार्फत केले जाणार असून याबाबतचे सर्व अधिकार कंपनीस राहणार आहेत. प्रवासी वाहतुकीच्या संचलनात येणाऱ्या तुटीचे दायित्व ज्या महानगरपालिका, नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या संख्येने बसेस कार्यरत राहतील त्या संख्येनुसार त्या त्या महानगरपालिका, नगर परिषदांना स्वीकारावे लागणार आहे. तसेच नफा झाल्यास परिवहन सेवा विकासकामे व अद्ययावतीकरणासाठी हा निधी वापरावा लागणार आहे.

असे असेल १५ सदस्यीय संचालक मंडळ

"कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित" या संयुक्त उपक्रमाचे संचालक मंडळ १५ सदस्यीय असणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय अधिकारी अथवा आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे पदसिद्ध अध्यक्ष व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापक सचिव असणार आहेत, तर आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी व महापौर संचालक असणार आहेत. त्याशिवाय उल्हासनगर भिवंडी-निजामपूर शहर या महानगरपालिकांचे आयुक्त व महापौर, तसेच अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर या नगर परिषदांचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष, केंद्रीय सडक मार्ग परिवहन संस्थेचे संचालक, एमएमआरडीएचे परिवहन व दळणवळण विभागप्रमुख आणि कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे या संचालक मंडळात पदसिद्ध संचालक असणार आहेत. उपक्रमाने प्रस्तावित केल्यास आवश्यकतेनुसार शासनाकडून संचालक अथवा तज्ज्ञ यांच्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत.

"एकत्रित बससेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार. ही बससेवा निश्चितच ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरेल. परंतु बससेवेबरोबरच रेल्वे, मेट्रो, जलमार्ग यांची एकात्मिक परिवहन सेवा सुरू करून शहरे जोडल्यास त्याचा नागरिकांना अधिक फायदा होईल." - राम पातकर (माजी नगराध्यक्ष, बदलापूर)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in