भिवंडीत मॅनहोलमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू

भिवंडी शहरातील कामतघर फेणेपाडा परिसरात ड्रेनेज सफाईदरम्यान मॅनहोलमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली आहे.
भिवंडीत मॅनहोलमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू
भिवंडीत मॅनहोलमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू
Published on: 

ठाणे : भिवंडी शहरातील कामतघर फेणेपाडा परिसरात ड्रेनेज सफाईदरम्यान मॅनहोलमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. सुरज धोत्रे आणि अक्कू अशी मृत सफाई कामगारांची नावे आहेत. भिवंडीतील फेणेपाडा परिसरात ठेकेदाराकडून ड्रेनेज सफाईसाठी एक कामगार मॅनहोलमध्ये उतरला होता. मात्र, मॅनहोलच्या आत गुदमरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगारही मॅनहोलमध्ये उतरला, पण तोही आत गुदमरला आणि त्याचाही मृत्यू झाला. काही क्षणातच हा मॅनहोल दोन कामगारांसाठी मृत्यूचा सापळा ठरला.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी निजामपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे आपत्कालीन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने दोन्ही कामगारांचे मृतदेह मॅनहोलमधून बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

सुरक्षेची साधने, उपायांची वानवा

या घटनेनंतर ठेकेदाराच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले सेफ्टी किट, ऑक्सिजनची व्यवस्था आणि इतर सुरक्षेची साधने कामगारांना देण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात येत आहे. दोन कामगारांचा जीव गेल्यानंतर स्थानिक नगरसेवक कमलाकर पाटील यांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.मॅनहोलमध्ये उतरलेल्या कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार का आणि या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना प्रशासन जाब विचारणार का? असे संतप्त सवाल आता उपस्थित होत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)