

भिवंडी : भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य घडले. भाजपच्या सहा फुटलेल्या नगरसेवकांनी सेक्युलर फ्रंटसोबत ‘हात’मिळवणी केल्याने या निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली होती. भाजपचे बंडखोर व सेक्युलर फ्रंटचे उमेदवार नारायण चौधरी (४८ मते) यांनी शिंदे गटाचा पाठिंबा लाभलेल्या कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील (२५ मते) आणि भाजपच्या स्नेहा पाटील (१६ मते) यांचा पराभव करून महापौरपदाची माळ गळ्यात घातली. सेक्युलर फ्रंटचे (काँग्रेस) तारिक मोमीन यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार झटका दिला असून, काँग्रेसने ‘चंद्रपूर’चा बदला घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भिवंडी महापालिका महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत महापालिकेच्या सभागृहात शांततेत पार पडली. यावेळी भाजप, सेक्युलर फ्रंट आणि शिंदे सेना अशी तिरंगी लढत झाली. प्रशासनाकडून महापौरपदाच्या निवडणुकीवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.
काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक आणि भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांच्यासह त्यांचा ६ जणांचा बंडखोर गटही ‘सेक्युलर फ्रंट’सोबत व्होल्व्हो बसमध्ये फेटे बांधून शाही थाटात महापालिकेत दाखल झाला. त्यामुळे नारायण चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, हे नक्की होते. सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत महापौरपदासाठी नारायण चौधरी यांना ४८ मते, तर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना २५ मते, तसेच भाजपच्या स्नेहा पाटील यांना १६ मते पडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी भाजप बंडखोर नारायण चौधरी यांना विजयी घोषित केले. नारायण चौधरी यांना पडलेल्या मतांमध्ये काँग्रेसच्या ३० आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाच्या १२ मतांचा समावेश आहे.
उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तारीक मोमीन यांना ४३, तर शिंदे सेनेचे जावेद दळवी यांना २५ त्याचप्रमाणे भाजपचे सुहास नकाते यांना २१ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसने चंद्रपूर महापालिकेचा बदला भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत घेतल्याचे बोलले जात असून ऐनवेळी बदलेल्या समीकरणांमुळे काँग्रेसकडून भाजपला हा मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
“महापौरपदासाठी जनतेने भरपूर प्रेम दिले. मी सर्वांचा आभारी आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून कारवाईबाबत आता मिर्ची मसाला नको. विकासाला प्राधान्य दिले जाईल. देव तारी त्याला, कोण मारी,” अशा शब्दांत महापौरपदी निवडून आलेल्या नारायण चौधरी यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.
“शहराचा विकास करणे हेच आमचे प्राथमिक प्राधान्य आणि ध्येय असणार आहे. मला उपमहापौरपदी विराजमान करणाऱ्या सर्व वरिष्ठांचा मी आभारी आहे. भिवंडीतील जनतेने मला निवडून दिले, त्याबद्दल जनतेचेदेखील आभार मानतो. निश्चितच भिवंडीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार,” असे काँग्रेसचे उपमहापौर तारिक मोमीन यांनी सांगितले.
“हा भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. सेक्युलर फ्रंटचा विजय आहे. विचार बदला, भिवंडी बदलेल. आम्ही तोडण्याचे काम करत नाही, जोडण्याचे काम करतो,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी (शप) पक्षाचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी दिली.
भिवंडी महापालिकेत महापौरपदी निवडून आलेले नारायण चौधरी हे भिवंडी सेक्युलर फ्रंटचे महापौर आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत काँग्रेस, समाजवादी हे पक्ष भाजपकडून फोडण्यात येत होते. मात्र, पहिल्यांदाच महायुती व भाजप फुटली आहे, आणि त्यामुळे भिवंडीत सेक्युलरचा महापौर बनला आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादीच्या नगरसेवकांचा पाठिंबा सेक्युलर फ्रंटला राहिला आहे, असे मत समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केले.
नाट्यमय घडामोडी ते घोडेबाजाराला ऊत
भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. तसेच मोठ्या प्रमाणात घोडेबाजारालाही ऊत आला होता. भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांना महापौरपदासाठी शब्द दिला होता, पण ऐनवेळी त्यांनी स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली. अखेर फोडाफोडीच्या राजकारणात ‘सेक्युलर फ्रंट’ला यश आले असून महापौर, उपमहापौरपदी बाजी मारण्यात यश मिळाले आहे.
अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर गैरहजर
भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर गैरहजर राहिले. ऐनकर यांनी कोणार्क विकास आघाडी व शिंदे सेनेचे महापौरपदाचे उमेदवार विलास पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्या संदर्भातील गटनोंदणी देखील कोकण आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या दिवशी नितेश ऐनकर गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
भाजपच्या ६ जणांनी केली बंडखोरी
नारायण चौधरी, नंदिनी गायकवाड, अश्विनी फुटाणकर, दीपा मढवी, सुहास नकाते, शेख अबूशाह लल्लन या ६ जणांनी बंडखोरी करीत सेक्युलर फ्रंटशी हातमिळवणी केली.
भाजप प्रदेशाध्यक्षांचे कारवाईचे संकेत
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याप्रकरणी नारायण चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. “पक्षाचा व्हिप डावलणाऱ्या नगरसेवकांवर योग्य ती कारवाई केली जाईल. गुरुवारी संध्याकाळपासून नारायण चौधरी यांना बंडखोरी करू नका, म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला होता. पक्षाविरोधात गेलात तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. सकाळपर्यंत ते आम्ही बंडखोरी करणार नाही असे सांगत होते. तरी त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.