भिवंडी महापालिकेचे प्रवेशद्वार तोडून कामगारांचा ठिय्या; ‘या’ आहेत मागण्या

श्रमजीवी संघटनेचे शेकडो कामगारांचे भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
भिवंडी महापालिकेचे प्रवेशद्वार तोडून कामगारांचा ठिय्या; ‘या’ आहेत मागण्या

भिवंडी : श्रमजीवी संघटनेचे शेकडो कामगारांचे भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अचानकपणे शेकडो कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत, महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार तोडून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षारक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

महानगरपालिका क्षेत्रातील कंत्राटी कामगार, पाइपलाईन निगा दुरुस्ती बोरवेल कामगार फिल्टर व वॉलमनच्या प्रश्नाबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून आंदोलन तसेच निवेदन देऊन कामगारांच्या प्रश्नाबाबत म्हणणे मांडले, परंतु त्यांचे प्रश्न आजपर्यंत सुटले नसल्याने अखेर कंत्राटी कामगारांनी सोमवारी आक्रमकपणे आंदोलन सुरू केल्याचे सांगण्यात आले.

श्रमजीवी संघटनेचे कामगार नेते महेंद्र निरगुडा यांनी सांगितले की, मे. बुबेर कन्स्ट्रक्शन, मे. राम कोरे, मे. जखनुस कन्स्ट्रक्शन आणि बाबुलाल पटेल या ठेकेदारांकडून कामगारांना किमान वेतन, वेतनातील फरक देण्यात आलेला नाही. मे. बुबेर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून आमच्या सभासद कामगारांना किमान वेतन, पगाराची स्लीप ओळखपत्र, किमान वेतनातील फरक व दिवाळी बोनस यापैकी कोणतीच सुविधा देण्यात आलेली नाही. तसेच सबंधित ठेकेदाराकडून माहे ऑक्टोबर २०२२ ते आजतगायत भविष्यनिर्वाह निधी कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही. ठेकेदाराकडून आमच्या सभासद कामगारांना प्रत्येक महिन्याचा पगार महिना संपताच न देता तो २ ते ३ महिन्यांत देण्यात येतो. प्रत्येक महिन्यात पगार देत नसल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते, असे आदोलनकर्ते कामगारांनी सांगितले आहे.

तसेच भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात आपण विविध विकास कामे करून शहराचा विकास करत आहात उदा. उड्डाणपुलाचे काम, बुलेट ट्रेन, शाळा, कॉलेज, रस्ता रुंदीकरण, वेगवेगळी उद्याने, वेगवेगळे पार्क व शहर सुंदर बनवण्यासाठी सुशोभीकरण करून शहराचा विकास करत आहात. परंतु हा विकास होत असताना देशाच्या स्वातंत्र्याला ७८ वर्ष पूर्ण होत आहेत. तरी देखील शहरातील आदिवासी पाडे विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांच्या विकासाकडे मात्र आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असे आमच्या लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आक्रमक अंदोलनकर्ते पालिका मुख्य प्रवेशद्वार तोडून आतमध्ये शिरल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले, तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत पालिका मुख्यालयातून हटणार नसल्याची भूमिका आदोलनकर्त्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

‘या’ आहेत मागण्या

१) ठेकेदाराकडून आमच्या सभासद कामगारांना प्रत्येक महिन्याचा पगार वेळेत द्यावा.

२) ठेकेदाराकडून आमच्या सभासद कामगारांना किमान वेतन, किमान वेतनातील फरक देण्यात यावा.

३) ठेकेदाराकडून माहे ऑक्टोबर २०२२ ते आजतागायत भविष्य निर्वाह निधी कामगारांच्या खात्यात जमा केलेला नाही, तो तत्काळ जमा करावा.

४) ठेकेदाराकडून आमच्या सभासद कामगारांना प्रत्येक महिन्याची पगाराची स्लीप देण्यात यावी.

५) ठेकेदाराकडून आमच्या सभासद कामगारांना ओळखपत्र देण्यात यावे.

६) भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासींच्या वाढीत घरपट्ट्या कमी कराव्यात.

(७) भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासींच्या पाड्यांना नियमित पाणी सोडण्यात यावे.

८) भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासींना घरकुलाचा लाभ द्यावा.

९) भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासींच्या पाड्यावर स्मशानभू‌मी द्यावी.

१०) भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासींना वैयक्तिक शौचालय लाभ द्यावा.

११) भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक आदिवासी पाड्यावर समाजहॉल बांधून द्यावा.

१२) महानगरपालिका क्षेत्रात मोहल्ला समिती गठित करून वन दाव्यांचा तत्काळ निपटारा करावा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in