भिवंडी : महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने शहराच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. या आरक्षणामुळे भिवंडीत काँग्रेसचा नगरसेवक महापौर होण्याची शक्यता बळावली असून, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेस नगरसेवक तारिक मोमीन यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.
भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे ३० नगरसेवक निवडून आले असून तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसनंतर भाजपचे २२, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १२, शिवसेना १२, समाजवादी पक्ष ६, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, तर १ अपक्ष सदस्य निवडून आला आहे. मागील कार्यकाळात महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते.
सध्याच्या संख्याबळाचा विचार करता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना बहुमतासाठी अवघ्या चार सदस्यांची कमतरता आहे. मात्र सत्तास्थापनेच्या दृष्टीने समाजवादी पक्ष, कोणार्क विकास आघाडी आणि भिवंडी विकास आघाडी सत्तेच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता असल्याने, भिवंडीत पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर येण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची पिछेहाट सुरू असताना, भिवंडीमध्ये मात्र पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
शरद पवार गटाकडे उपमहापौरपद?
काँग्रेसच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अनुभवी व ज्येष्ठ सदस्यांची संख्या तुलनेने कमी असून, बहुसंख्य नगरसेवक नव्याने निवडून आलेले आहेत. अशा परिस्थितीत आमदार रईस शेख यांचे विश्वासू आणि अनुभवी म्हणून ओळखले जाणारे तारिक मोमीन यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे माजी उपमहापौर इमरान खान यांची मुलगी अॅड. ईशा इमरान खान यांच्या नावावर उपमहापौर पदासाठी एकमत झाल्याचेही सांगितले जात आहे. महापौरपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे प्रशांत लाड यांचे नावही चर्चेत असून, अंतिम निर्णयासाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत भिवंडीच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.