

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरीवली गावात गुरुवारी पहाटेपासून ईडी, आयकर विभाग आणि एटीएस यांनी संयुक्त छापेमारीला सुरुवात केली आहे. दहशतवादी कृत्यांशी संबंधित संशयित आर्थिक व्यवहारांच्या तपासाचा भाग म्हणून गावातील अनेक घरांवर ही कारवाई करण्यात येत आहे.
छापेमारीदरम्यान गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावाबाहेरील मैदानात वीसहून अधिक वाहनांचा ताफा उभा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात तणावाची स्थिती असून नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीतील पडघा, पुणे, मालेगाव यांसह महाराष्ट्रातील तब्बल ४० ठिकाणी सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे.
हे ऑपरेशन (आयएस-आयएस) टेरर मॉड्यूलशी संबंधित आर्थिक हालचालींच्या तपासाशी निगडित असून, एनआयएने दाखल केलेल्या प्रकरणावरून ईडीनं अलीकडेच ECIR नोंदवला आहे. हा तपास साकिब नाचन प्रकरणाशी संबंधित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
२८ जून रोजी कारागृहात मृत्यू झालेल्या साकिब नाचनच्या दफनविधीनंतर एटीएसची ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ईडी, आयकर विभाग आणि एटीएस यांनी संयुक्त ऑपरेशनल ग्रिड तयार करून तातडीने ही छापेमारी राबवल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त पथकाची कारवाई सुरू असून बोरिवली गावात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.