भिवंडी : भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार माजी महापौर विलास पाटील व प्रतिभा पाटील यांच्या बंगल्यावर हल्लाची घटना रविवारी रात्री घडली आहे. हल्ला करणारे आमदार महेश चौघुले यांचे पुत्र मित चौगुले व त्यांचे समर्थक असल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्यामुळे विलास पाटलांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या संदर्भात ठिय्या मांडलेला होता. दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात राडा झाला होता.
प्रथम विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर महेश चौघुले यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. दोन्ही गटाच्या आंदोलकांना पोलिसांनी पांगविले आहे. त्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी मोठा राडा झाला असल्याने भिवंडीत तणाव ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच या हल्ल्यात माजी महापौर विलास पाटील यांच्या पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील व त्यांचे दोन कार्यकर्तेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती माजी महापौर विलास पाटील यांनी दिली. तसेच महेश चौघुले यांनी दगडफेकीचा आरोप फेटाळून लावला असून त्यांच्याही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची प्रतिक्रिया आमदारांनी दिली आहे.