
भिवंडी : भिवंडीतील खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा एक तरुणाचे आयुष्य संपुष्टात आले आहे. भिवंडी कल्याण मार्गावरील टेमघर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात राज निरंजन सिंग (१९) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
माहितीनुसार, राज आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरी जात असताना अचानक रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली. दोघेही रस्त्यावर कोसळले आणि त्या वेळी मागून येणाऱ्या एका कंटेनरने राजला धडक दिली. क्षणभरात तरुणाचा जीव गेला. राज हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. बी.कॉमचा विद्यार्थी असलेला राज अभ्यासू आणि आयुष्याबद्दल मोठी स्वप्ने बाळगणारा होता.
त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. भिवंडीतील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, शहर असो वा ग्रामीण भाग, सर्वत्र रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे आणि नागरिकांच्या जीवाशी धोका निर्माण होत आहे.