Bhiwandi : गर्भवतीची रिक्षातच प्रसूती; रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे रिक्षातच तिची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील कल्याण नाका परिसरात मंगळवारी रात्री घडली.
Bhiwandi : गर्भवतीची रिक्षातच प्रसूती; रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Bhiwandi : गर्भवतीची रिक्षातच प्रसूती; रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Published on

सुमित घरत/भिवंडी

प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे रिक्षातच तिची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील कल्याण नाका परिसरात मंगळवारी रात्री घडली. सुदैवाने महिला आणि नवजात बाळाची प्रकृती सुखरूप आहे. या घटनेमुळे शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

रिक्षात प्रसूती झालेल्या महिलेचे नाव वर्षा कमलेश यादव असून त्या भिवंडी शहरातील अजमेर नगर परिसरात कुटुंबासह राहतात. मंगळवारी सायंकाळी त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रिक्षातून स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. मात्र, कल्याण नाका परिसरातील खड्डेमय रस्ते आणि वाहतूककोंडीमुळे रिक्षा अडकून पडली. अवघ्या आठ ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल पाऊण तास लागला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बसणारे धक्के आणि वाहतूककोंडीमुळे त्रस्त झालेल्या वर्षा यादव यांना प्रसूती वेदना तीव्र झाल्या. अखेर कल्याण नाका ते जकात नाका दरम्यान रिक्षातच त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

यानंतर तातडीने आई आणि नवजात बाळाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिली. या घटनेमुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघात, वाहतूककोंडी आणि आता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रिक्षात झालेली प्रसूती या घटनांमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून भिवंडी शहर खड्डेमुक्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रिक्षात माझ्या घरातील व्यक्ती होती. त्यामुळे मी सावधपणे रिक्षा चालवत होतो. मात्र, घरची गाडी असूनही खड्ड्यांमुळे माझ्याच घरातील महिलेची प्रसूती रिक्षात झाली. सुदैवाने आई आणि बाळ सुखरूप आहेत. पण काही अघटित घडले असते तर त्याची जबाबदारी कोण घेतली असती?

संजय यादव, रिक्षाचालक आणि महिलेचे नातेवाईक

११७९ कोटींच्या बजेटमध्ये रस्त्यासाठी ५ कोटींची तरतूद

भिवंडी महापालिकेचे वार्षिक आर्थिक बजेट ११७९ कोटी रुपये असून रस्ते दुरुस्तीसाठी सुमारे ५ कोटी ९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात आणि इतर वेळीही शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in