

भिवंडी : भिवंडीतील एका अनुदानित उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाखाली अतिरिक्त फी मागणाऱ्या मुख्याध्यापिकेसह तीन महिलांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अतिया बैदुझमान खान (मुख्याध्यापिका), रिजवाना बानू अमजद खान (खासगी कॉम्प्युटर शिक्षिका) आणि अस्मा मोहशफी शेख (खासगी लिपिक) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सलाउद्दीन अयुबी मेमोरियल हायस्कूल या उर्दू माध्यमाच्या शासकीय अनुदानित शाळेत तक्रारदार अबुलैस अन्सारी हे आपल्या मुलीच्या इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी ७ मे रोजी गेले होते. त्यावेळी शाळा प्रशासनाने ५ हजार रुपये देणगी व फी म्हणून मागणी केली.
शाळा अनुदानित असतानाही अतिरिक्त रक्कम मागितली जात असल्याने तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने तांत्रिक पडताळणी करून ११ मे रोजी सापळा रचला.
या कारवाईदरम्यान, विद्यार्थिनीच्या प्रवेशावेळी ४ हजार रुपये स्वीकारताना तिन्ही आरोपी महिलांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ मे रोजी आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.