भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; वंजारपट्टी नाका येथे दगडफेक, परिसरात तणावपूर्ण शांतता
भिवंडी : मंगळवारी दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. शहरात दुपारी तीन वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू झाली होती. त्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीमधील गणेश मूर्ती असलेले वाहन वंजार पट्टी नाका परिसरात आले असता सुंदर बेणी कंपाऊंड घुंगट नगर येथील श्री हनुमान मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याच्या घटनेनंतर या संपूर्ण परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
गणेश भक्तांनी रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर आमदार महेश चौघुले, आर एस एसचे राजेश कुंटे, बजरंग दलाचे संदीप भगत, दादा गोसावी यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी काही जणांना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना घडली. घटनेची दखल घेत सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी, पराग म्हणेरा यांसह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस व दंगल नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.
तणाव अजून वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरिक जखमी झाले तर जमावाकडून झालेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे. बुधवारी याच ठिकाणाहून मुस्लिम धर्मियांच्या ईद-ए- मिलाद उन नबी सणानिमित्त भव्य मिरवणूक निघाला होता. त्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला होता.
भिवंडीत तणावपूर्ण शांतता
शहरात मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादानंतर बुधवारी मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद निमित्ताने निघणारा जुलूस सायंकाळी शहरातील कॉटर गेट मस्जिद येथून सुरू झाला. या जुलूसमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही हुल्लडबाज तरुणांनी वाहनांची तोडफोड करून दोन ते तीन तरुणांना बेदम मारहाण केली. यानंतर काही काळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शहरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस प्रशासनात सहकार्य करावे तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता भंग करणाऱ्या पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून कुणीही शहरातील शांतता भंग करू नये. - श्रीकांत परोपकारी, पोलीस उपायुक्त भिवंडी