

भिवंडी : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आत्मसमर्पण केलेला आरोपी सोनुकुमार किशनलाल दिवाकर याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पुन्हा एक दिवसाची वाढ केली आहे.
रविवारी त्याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, भिवंडी येथील न्यायमूर्ती एस. एस. घोडके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी दिवाकर याला २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. आणखी वेळ तपासासाठी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात मांडल्यानंतर कोठडीत वाढ करण्यात आली.
दरम्यान, टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोनुकुमार दिवाकरसह सर्व १५ आरोपींना सोमवारी (३ ऑगस्ट) पुढील सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या सुनावणीत तपासाची प्रगती, आरोपींच्या कोठडीबाबतचा निर्णय तसेच पुढील न्यायालयीन प्रक्रिया निश्चित होण्याची शक्यता आहे.