भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा; रस्त्यावर खोदकामाचे दगड आल्याने वाहतूककोंडी

मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावरील आठपदरी काँक्रीट रस्ता बनवण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र दररोज पहावयास मिळत आहे. या वाहतूककोंडीत वाहनचालक, प्रवासी आणि चाकरमान्यांना दररोज अडचणींना सामना करावा लागत आहे.
भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा; रस्त्यावर खोदकामाचे दगड आल्याने वाहतूककोंडी
Published on

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावरील आठपदरी काँक्रीट रस्ता बनवण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र दररोज पहावयास मिळत आहे. या वाहतूककोंडीत वाहनचालक, प्रवासी आणि चाकरमान्यांना दररोज अडचणींना सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी मानकोली ते पिंपळास या दरम्यान ओवळी खिंड येथे मोठागाव मानकोलीकडे जाणाऱ्या रस्त्यातलगत मुख्य रस्त्यावर डोंगराचे खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी दगड कोसळत असल्याने या मार्गावर ४ ते ५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने प्रचंड वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहे.

ओवळी खिंड येथे मोठागाव-डोंबिवलीकडे रस्ता जाण्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावरील डोंगर फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. ठेकेदारासह पोलिसांना रस्त्यातील ढिगारा जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून वाहनांना वाट मोकळी करून द्यावी लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना देखील कसरत करावी लागत आहे.

मानकोली ते खारीगाव टोलनाका दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून या मार्गावरील वाहतूक दररोज अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.

भिवंडीतील वाहतूक समस्या निराकरणासाठी आढावा बैठक

भिवंडी महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहरात रस्तारुंदीकरण होत नसल्याने आणि पार्किंगच्या जागेची सोय उपलब्ध नसल्याने शहरातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलीस विभाग आणि महापालिका अधिकारी यांच्या कृती समितीची पालिका कार्यालयात बैठक संपन्न झाली होती. दरम्यान, बुधवारी २८ मे रोजी झालेल्या या बैठकीमध्ये शहरातील अनधिकृत व विनापरवाना रिक्षांवर परिवहन विभागामार्फत सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. महानगरपालिका, पोलीस विभाग आणि परिवहन विभाग यांनी एकत्रित पाहणी करून शहरामध्ये नो पार्किंग, दिशादर्शक फलक लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरामध्ये शासनाकडून सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू असून ते एक महिन्यामध्ये पूर्ण होणार असल्याबाबत पोलीस विभागाने स्पष्ट केले. एसटी महामंडळाने भिवंडी बस स्थानकामध्ये रिक्षा पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी महूसल विभाग, पोलीस विभाग यांचेसोबत महानगरपालिका अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कारवाई करावी, जेणेकरून त्या भागात कोणत्याही प्रकारे वाहतूककोंडी होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in