

भिवंडी : ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (२६ ऑगस्ट) भिवंडी शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
अहमदाबाद महामार्गावरून वाडामार्गे भिवंडीत येणाऱ्या जड-अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी राहणार आहे. नदी नाका मार्गे येणाऱ्या वाहनांना पारोळ फाटा येथे अडविण्यात येणार असून, हलकी वाहने खोणी गाव, तळवली नाका, कांबा मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील. मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपा येथून भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना धामणगाव पाइपलाइन नाका व चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने पर्यायी मार्गाने वाडा किंवा इच्छित स्थळी जाऊ शकतील.
ठाणे-कल्याणकडून जुना ठाणे-आग्रा रोडने वाडा व नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना एसटी स्टँड येथे प्रवेशबंदी असून, वेताळपाडा-नागाव रोडमार्गे जाता येईल. राजनोली नाक्याकडून येणाऱ्या जड-अवजड वाहनांनाही निर्बंध राहतील.
दरम्यान, एसटी, केडीएमटी व टीएमटी बसमधील प्रवाशांना नियोजित ठिकाणी उतरवून बसेस माघारी वळविण्यात येणार आहेत. कोटरगेट मस्जिद ते मामा-भांजा दर्गा या मुख्य मिरवणूक मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहन पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.