भिवंडी : भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पहिल्या घटनेत चाळीत राहणाऱ्या रुपेशकुमार यांची १७ वर्षे ६ महिने वयाची बहीण मैत्रिणीकडे जाऊन येते, असे आईला सांगून घराबाहेर पडली. मात्र, ती घरी परतली नाही. अखेर शांतीनगर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत ब्रह्मानंद नगर, कामतघर परिसरातील १७ वर्षे १० महिने वयाची अल्पवयीन मुलगी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली. बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने तिच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.