नवीन आधार कार्ड काढण्यापासून भिवंडीकर वंचित; स्थानिक पातळीवर सुविधा नसल्याने ठाणे, मुंबईचा पर्याय

आधार कार्ड बनवण्यासाठी भिवंडीत एक ही केंद्र नसल्याने नवीन आधार कार्ड बनविणाऱ्यांना ठाणे अथवा मुंबईची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे भिवंडीत १८ वर्षांवरील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
नवीन आधार कार्ड काढण्यापासून भिवंडीकर वंचित; स्थानिक पातळीवर सुविधा नसल्याने ठाणे, मुंबईचा पर्याय
Published on

सुमित घरत/भिवंडी

केंद्र शासनाने भारतीय नागरिकांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून २००९ मध्ये आधार कार्ड सक्तीचा नियम लागू केला. त्यानंतर ही आधार कार्डची प्रक्रिया संपूर्ण देशभर आजतागायत सुरू आहे. यामध्ये ६ महिन्यांच्या बालकापासून ते वृद्धांपर्यंतच्या ओळखीसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे मानले जाते. परंतु हेच आधार कार्ड बनवण्यासाठी भिवंडीत एक ही केंद्र नसल्याने नवीन आधार कार्ड बनविणाऱ्यांना ठाणे अथवा मुंबईची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे भिवंडीत १८ वर्षांवरील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षांवरील नागरिकांना राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे मानले जात आहे. त्यातच एकीकडे राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र १८ वर्षांवरील काही युवतींकडे आधार कार्ड नसल्याने सदर योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान ठाणे-पालघर जिल्ह्यातील १८ वर्षांवरील युवतींना तालुका पातळीवर नवीन आधार कार्ड बनवून मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. आधार कार्ड मिळविण्यासाठी मुंबई येथील जी. डी. सोमानी रोड गणेश मूर्तीनगर कुलाबा सेंटर येथे किंवा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करून आधार कार्ड मिळवावे लागत आहे. तर इतर राज्यातील जिल्हा पातळीवरील १८ वर्षांवरील युवतींना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन किंवा आधार कार्डसाठी शेवटचा पर्याय म्हणून कुलाबा सेंटरच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याची माहिती उघड झाली आहे.

यासह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आधार कार्ड अपडेट करिताही शेवटचा पर्याय हा कुलाबा सेंटर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणात मानसिक, शारीरिक, आर्थिक फरफट सुरू असून संबंधित प्रशासनाने ही हेळसांड थांबवण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर नवीन आधार कार्ड केद्र तयार करण्यासाठी पर्यायी उपाययोजना अंमलात आणावी अशी मागणी नवीन आधार कार्डपासून वंचित असलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

मी ३२ वर्षीय विवाहित गृहिणी आहे. एकीकडे राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. दुसरीकडे योजनेसाठी आधार कार्डची सक्ती आहे. परंतु काही कौटुंबिक कारणास्तव आधार कार्ड बनवू शकले नाही. तर १८ वर्षांवरील नागरिकांना नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी तालुका स्तरावर सुविधा नसून कुलाबा सेंटर आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असे दोनच पर्याय असल्याने लाडकी बहीण योजनेसाठी शारीरिक, आर्थिक

हेळसांड करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तालुकास्तरावर १८ वर्षांवरील नागरिकांसाठी नवीन आधार कार्ड बनवण्याची सुविधा उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय दूर करावी.

- प्रियांका वर्मा, आधार कार्ड वंचित महिला, भिवंडी

logo
marathi.freepressjournal.in