ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओवळा-माजिवडा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून सोमवारी तीन ठिकाणी तरणतलावांचे भूमिपूजन सोहळा पार पडला. ठाणे शहरामध्ये फक्त कळवा, कोपरी व वर्तकनगर या भागामध्येच नागरिकांच्या सोयीसाठी ऑलिम्पिक साइज जलतरण तलाव (स्विमिंग पूल) व त्याचठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात आलेले आहेत. ठाणे शहरात सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गरीब असे सर्व समावेशक समाजघटक राहत असून ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटी म्हणून ओळखण्याकडे होत आहे. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या इतर भागात नागरिकांना त्यांच्या जवळच आपापल्या भागात सरकारचे स्विमिंग पूल असावेत, अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे.
त्यानुसार १) कॉसमॉस- होरायझोन लगत असलेल्या सुविधा भूखंडावर, बेथनी हॉस्पिटलच्या मागील बाजूस, ठाणे. २) वाघबीळ गाव, रेतीबंदर रोड, ठाणे. ३) प्लॅटिनम चौक, रोझा गार्डनीय हॉस्पिटल समोर, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे. या तीन ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. या ठिकाणी जलतरण तलाव (स्विमिंग पूल) व त्याचठिकाणी जिम बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी स्वागत कक्ष, चेंजिग रूम, शौचालय, स्टोअर रूम व फिल्ट्रेशन प्लांट बनविण्यात येणार आहे.
प्रत्येकी १० कोटी रुपये निधी मंजूर
घोडबंदर रोड येथे स्विमिंग पूल बांधण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून प्रत्येकी १० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. शहरातील विद्यार्थी, नागरिक यांना पोहण्याची संधी मिळावी यासाठी शहरात स्विमिंग पूल तयार झाल्यास विद्यार्थी-तरुणांच्या क्रीडागुणांना वाव तर मिळेलच, त्यातून नवीन जलतरणपटू घडतील. तेथेच जिम असल्यास पोहणे व शारीरिक व्यायाम दोन्ही गोष्टी होतील. त्यामुळे सर्व अर्थाने शहराच्या वेगवेगळ्या भागात होणारे हे स्विमिंग पूल आणि त्याचठिकाणी अत्याधुनिक जिम्नॅशियम असल्यास विद्यार्थी- तरुण-नागरिक अशा सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.
- आ. प्रताप सरनाईक