वाडा : वाढवण बंदर उभारणीला केंद्रीय पर्यावरण विभागाकडून मिळालेल्या परवानगीमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उमटली असताना जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाकडून डहाणू चिकू फेस्टिवलला प्रायोजक केल्यामुळे डहाणू तालुक्यातील मच्छीमार चांगलेच आक्रमक झाले. त्याचा पडसाद म्हणून आयोजकांकडून लावण्यात आलेल्या जेएनपीएचे बॅनर मच्छीमारांकडून काढून टाकण्यात आले. याने जेएनपीएचा माज उतरविण्यात भूमिपुत्रांना यश मिळाल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हा युवा अध्यक्ष अनुज विंदे यांनी यावेळी सांगितले.
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द या सोशल मीडियाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर डहाणू चिकू फेस्टिवलचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर व्हॉट्सॲप ग्रुपमधील बंदर विरोधकांनी तातडीने फेस्टिवलच्या जागी भूमिपुत्रांना येण्याचे आवाहन केले. त्यानंतर शेकडोच्या संख्येने डहाणू आणि धाकटी डहाणू येथील क्रियाशील मच्छीमार आणि युवांनी घटनास्थळी पोहचून वाढवण बंदरविरोधी नारे देत मुख्य द्वारावर लावण्यात आलेले बॅनर काढण्याच्या हालचाली केल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता तहसीलदारांनी पुढाकार घेत स्वतःहून बॅनर काढण्याचे आदेश दिले तदनंतर बॅनर आणि फेस्टिवलसाठी जेएनएचे स्टॉल काढण्यात आले असल्याची माहिती वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे कार्यवाह मिलिंद राऊत यांनी दिली.
सदर मोहिमेत धाकटी डहाणू, डहाणू, वरोर येथील क्रियाशील मच्छीमारांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि तहसीलदार कार्यालयाला जनतेसमोर झुकते माप घ्यावे लागले. स्थानिक मच्छीमारांकडून घेण्यात आलेल्या आक्रमक भूमिकेचे पंचक्रोशीतील भूमिपुत्रांनी स्वागत केले आहे.