
कल्याण : आधीच दारुच्या नशेत असताना अजून दारु पिण्याची इच्छा झाली म्हणून दुकानातून दारु आणण्यासाठी एका २६ वर्षीय तरुणाने चक्क रहिवासी इमारतीबाहेर पार्क केलेली रिक्षा चोरल्याची घटना कल्याणमधून समोर आली आहे. याप्रकरणी कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो एसी मॅकेनिक असून दारूच्या नशेत त्याने रिक्षा चोरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील जिम्मी बागमधील जय श्रीहरी चाळीसमोर १८ एप्रिल रोजी राजेश देवीदयाल मेहुलीया (वय-४६) यांची राहत्या घरासमोर पार्क केलेली रिक्षा चोरीला गेली होती. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी पोलिसांनी प्रांजल मनोज बर्वे ( वय २६, न्यु जिम्मी बाग, कल्याण पुर्व) या आरोपीला अटक करुन गुन्हयातील ६५,००० रू. किंमतीची MH-05-CG-8672 रिक्षा जप्त केली.
दारू आण्यासाठी नशेत त्याने रिक्षा चोरली
रिक्षाचोरी प्रकरणी अटक केलेला प्रांजल मनोज बर्वे हा एका एसी मॅकेनिक आहे. दारु प्यायच्या सवयीमुळे त्याने दारु आणण्यासाठी रिक्षा चोरली होती असे समोर आले आहे. तथापि, रिक्षातील सीएनजी संपल्यावर ती एका ठिकाणी सोडून तो पसार झाला होता. अखेर सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी रिक्षा हस्तगत केली आहे. चोरीस गेलेली रिक्षा विठ्ठलवाडी बस डेपोजवळ उभी होती. चोरी झालेली रिक्षा इकडे का पार्क केली? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमॅरे तपासले आणि सीसीटीव्हीत कैद झालेल्या रिक्षा चोरट्याला प्रांजल बर्वे याला शोधून काढले. दोन दिवसापूर्वी प्रांजलने रात्रीच्या वेळेस दारु प्यायली होती. त्याला अजून दारु पाहिजे होती. त्यासाठी त्याने त्याच्या इमारतीच्या बाहेर उभी असलेली रिक्षा सुरू केली आणि दारु आणण्यासाठी निघाला. मात्र, रस्त्यातच रिक्षातील सीएनजी संपल्याने ती रिक्षा विठ्ठलवाडी बस डेपो समोर बंद पडली. त्यामुळे तो रिक्षा तिथेच सोडून घरी निघून गेला होता.