

डोंबिवली : राज्यात जास्तीत जास्त ‘बिनविरोध’ नगरसेवक निवडून आणण्याऱ्या डोंबिवलीत निवडणुकीपूर्वी भाजपकडून पैशांची पाकिटे वाटली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन भागात भाजपकडून नागरिकांच्या घरी तीन हजार रुपयांची पाकिटे वाटली जात असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना ‘रंगेहाथ’ पकडल्याचा दावा केला आहे. नागरिकांना पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली आणि प्रकार उघडकीस आणला.
या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून, पैशांचे वाटप नेमके कोणी आणि कुणाच्या सांगण्यावरून केले, याचा तपास केला जात आहे. निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गंभीर आरोप भाजपवर होत आहे.