भिवंडी लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात

गेल्या काही महिन्यांपासून भिवंडी लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यात आता आचारसंहिताही लागू झाली असल्याने राजकीय हालचालींना वेग येऊ लागल्याचे दिसत आहे. मात्र अद्यापही भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही.
भिवंडी लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात

बदलापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीने मात्र अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसल्याने या निवडणुकीत कपिल पाटील यांचा सामना सुरेश टावरे, दयानंद चोरघे, बाळ्यामामा म्हात्रे यापैकी कुणाशी होणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भिवंडी लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यात आता आचारसंहिताही लागू झाली असल्याने राजकीय हालचालींना वेग येऊ लागल्याचे दिसत आहे. मात्र अद्यापही भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही.

काँग्रेसकडून माजी खासदार सुरेश टावरे किंवा विद्यमान जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांना उमेदवारी मिळणार असल्याचा दावाही या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. असे असले तरी अद्याप या दोघांपैकी कुणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पदाधिकारीही अद्याप भिवंडीबाबत आशावादी असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होणे अपेक्षित असून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कपिल पाटील यांचे प्रतिस्पर्धी कोण असतील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काँग्रेस भिवंडीच्या जागेसाठी आग्रही

२०१४ पासून कपिल पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यापूर्वी काँग्रेसचे सुरेश टावरे हे या मतदारसंघाचे खासदार होते. त्यामुळे सुरुवातीपासून काँग्रेस भिवंडीच्या जागेसाठी आग्रही आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही या जागेवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात जोमाने सुरू केलेल्या दौऱ्यानंतर भिवंडीची जागा पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र काँग्रेसच्या बदलापुरातील पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसची परंपरागत असून काँग्रेसच लढवणार असा सुर लावून धरला आहे.

logo
marathi.freepressjournal.in