आदिवासी कातकरी समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध -संतोष चोथे

आदिम आदिवासी कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोखाडा तालुका भाजपा कटिबद्ध असल्याची ग्वाही तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांनी दिली
आदिवासी कातकरी समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध -संतोष चोथे

मोखाडा : आदिम आदिवासी कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोखाडा तालुका भाजपा कटिबद्ध असल्याची ग्वाही तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांनी दिली आहे. आदिम आदिवासी कातकरी समाजाची बैठक २५ फेब्रुवारी रोजी गांधिपुल शिवमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी कातकरी समाजाला संबोधित करताना ते बोलत होते.

याप्रसंगी भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांनी समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या आदिम आदिवासी कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असंख्य योजना या आपल्या आदिम आदिवासी कातकरी समाजाचा जीवनस्तर उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. आपल्या पालघर जिल्ह्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदिम आदिवासी कातकरी समाजाचे स्थलांतर रोखण्यासाठी शेळी पालन प्रकल्प राबवण्यासाठी आपल्या मोखाडा तालुक्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. ही जमेची बाब असल्याचे चोथे यांनी यावेळी नमूद केले आहे.

येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीमार्फत शेळी गट वाटप कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे व त्या माध्यमातून मागास असलेल्या आपल्या आदिम आदिवासी कातकरी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही अध्यक्ष संतोष चोथे यांनी दिली.

वंचित लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करणार

आदिम आदिवासी कातकरी समाजाला जनमन घरकुल योजनेच्या माध्यमातून वंचित असलेल्या सर्व लाभार्थ्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी पालक मंत्री यांनी संबंधित विभागांना आदेश दिले असून, आपल्या मोखाडा तालुक्यातील वंचित लाभार्थी शोधून काढण्यासाठी भाजपतर्फे प्रत्येक गावात सर्व्हे सुद्धा करण्यात येत आहे. आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी भाजप आपल्यासोबत असल्याची ग्वाही अध्यक्ष संतोष चोथे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेकडो कातकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in