अजब! भाजपने धरला काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; अंबरनाथमध्ये भाजपसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत, शिवसेना विरोधी बाकावर

निवडणुकीनंतर सत्ता समीकरणाच्या जुळवाजुळवीत एक अजब अशी युती अस्तित्वात आली आहे. सर्वाधिक सदस्यसंख्या असलेली शिंदेची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच अचानक आता भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याची खेळी करीत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले आहे.
अजब! भाजपने धरला काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; अंबरनाथमध्ये भाजपसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत, शिवसेना विरोधी बाकावर
अजब! भाजपने धरला काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; अंबरनाथमध्ये भाजपसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत, शिवसेना विरोधी बाकावर
Published on

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीनंतर सत्ता समीकरणाच्या जुळवाजुळवीत एक अजब अशी युती अस्तित्वात आली आहे. सर्वाधिक सदस्यसंख्या असलेली शिंदेची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच अचानक आता भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याची खेळी करीत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले आहे. त्यामुळे गेली ३५ वर्षे अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला यंदा विरोधी बाकावर बसावे लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप यांच्यात थेट लढाई होऊन भाजप १४ नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदावरही भाजपच्या तेजश्री करंजुले या निवडून आल्या आहेत, तर शिवसेना २७ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यात सध्या राज्यभरात महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप अनेक ठिकाणी युतीत लढत आहेत. त्यामुळे अंबरनाथमध्येही निवडणुकीनंतर शिवसेना, भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता होती. त्यानुसार नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटही घेतली होती. तसेच दोन दिवसांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत उल्हासनगर येथे शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची अंबरनाथमधील युतीबाबत सकारात्मक चर्चा केली होती.

‘अंबरनाथ शहर विकास आघाडी’ची झाली स्थापना

मात्र युतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असतानाच अंबरनाथमधील भाजपने मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत ‘अंबरनाथ शहर विकास आघाडी’च्या नावाने युती केली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेला धक्का बसला असून, याबाबत मंगळवारी सकाळी अंबरनाथ येथे शिवसेनेचे आमदार आणि स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. देशभर काँग्रेसचा विरोध करणाऱ्या भाजपने काँग्रेस सोबत केलेली युती म्हणजे ‘अभद्र युती’ असल्याचा आरोप आमदार किणीकर यांनी केला आहे. तसेच युतीबाबत खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी शब्द देऊनही युती धर्म न पाळल्याचा आरोपही किणीकर आणि शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

भाजपच्या खेळीमुळे शिवसेना सत्तेबाहेर

त्यामुळे भाजपच्या खेळीमुळे सर्वाधिक मोठा पक्ष असतानाही अंबरनाथमधील शिवसेनेला यंदा सत्तेबाहेर आणि विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अंबरनाथमधील शिवसेना-भाजप संघर्षाचे परिणाम राज्यातील इतर महापालिका निवडणुकांवर आणि युतीबाबत होतात का, हे पाहावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in