
ठाणे : भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आक्रमक रणनीती उभारण्यास सुरुवात केली आहे. स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार स्पष्ट केल्यानंतर भाजपने तरुण कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला आहे. महापालिका निवडणुकांची तारीख ठरली नसली तरी शहरात पक्षाची फेरमांडणी करण्यासाठी तरुणांची फळी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यात येत्या काही दिवसांत २० मंडळाच्या अध्यक्षपदासाठी तरुणांची नियुक्ती करण्यावर भाजपने भर दिला आहे. त्यातही हे तरुण ३५ ते ४५ वयोगटातील असतील, असेही भाजपच्या श्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. या तरुणफळीचा सर्वे सुरू करण्यात आला असून, येत्या काही दिवसांत त्यांची नियुक्ती केली जाणार असल्यामुळे तरुण अध्यक्षांसाठी शोधाशोध सुरू केले आहे.
भाजपचे ठाण्यात ३० मंडळ अध्यक्ष होते, परंतु आता ती संख्या २० वर आणण्यात आली आहे. यापूर्वी मंडळ अध्यक्षांना दोन दोन प्रभाग साभांळावे लागत असल्यामुळे त्यांची कसरत होत होती. परंतु आता एक एका प्रभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या कामाचा ताणही कमी होणार आहे. परंतु आता तरुण मंडळ अध्यक्ष येणार असल्याने त्यांच्या माध्यमातून प्रभागातील तरुणांपर्यंत जाण्याबरोबर भाजपचे ध्येय धोरण आणि केलेली विकासकामे हे पोहचविण्याचे महत्त्वाचे काम त्यांना करावे लागणार आहे.
येत्या काही दिवसांत तरुण मंडळ अध्यक्षांची फळी उभी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने पालिकेत भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पुढील महापौर हा भाजपचाच
ठाण्यात भाजपने 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यात भाजपचे आमदार संजय केळकर पुढील महापौर हा भाजपचाच असेल, असा दावा केला आहे. त्यानुसार आता भाजपने पक्षबांधणी सुरू केली असून सदस्य नोंदणीत देखील ठाण्यात भाजपने मोठी उडी घेतल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता तरुण मतदारापर्यंत पोहचण्यासाठी आता तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी केली जात आहे. त्याची आखणी देखील करण्यात आली असून यापुढील मंडळ अध्यक्ष हे ३५ ते ४५ वयोगटातीलच असतील, असा भाजपचे श्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आता पक्षातील, अशा भावी मंडळ अध्यक्षांचा सर्व्हे भाजपच्या श्रेष्ठींनी सुरू केला आहे.
शहर अध्यक्षही ४५ ते ५० वयोगटातील
मंडळ अध्यक्षाबरोबर आता शहर अध्यक्ष देखील ४५ ते ५० वयोगटातील असावा याबाबत चर्चा सुरू झाली असून तसे झाल्यास पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तसेच आता भाजपमधील प्रत्येक माजी नगरसेवक आपले वय तपासू लागला असून आपण त्यात बसतो का? याची चाचपणी करू लागला आहे. परंतु जे या वयात बसणार नाहीत, ते आपोआपच शहर अध्यक्ष पदाच्या रेसमधून बाहेर फेकले जाणार आहेत.