पार्किंगच्या किरकोळ वादातून हाणामारी
Photo: Navneet Barhate

पार्किंगच्या किरकोळ वादातून हाणामारी

उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलास कॉलनीमध्ये किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष आता गंभीर स्वरूपात बदलला आहे.
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलास कॉलनीमध्ये किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष आता गंभीर स्वरूपात बदलला आहे. १५ दिवसांपूर्वी जयकाली ग्रुप गणपती मंडळाजवळ राहणाऱ्या मंगेश आणि फैजान शेख यांच्यात मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. फैजानने मंगेशची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे दोघांमध्ये वादविवाद आणि शिवीगाळ झाली होती.

या वादाचा राग मनात ठेवून मंगेशने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आपल्या दोन साथीदारांसह फैजानवर हल्ला केला. फैजान आपल्या मित्राची वाट पाहत असताना, मंगेशने लोखंडी कड्याने त्याच्या तोंडावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे फैजान गंभीर जखमी झाला.

हल्ल्याचा आवाज ऐकून फैजानचा भाऊ गुरफान घटनास्थळी धावून आला आणि मंगेशला जाब विचारला. यावेळी मंगेशने गुरफानला भिंतीवर ढकलून दिले, परंतु गुरफानने मंगेशला पकडून ठेवले. याचवेळी मंगेशच्या तिसऱ्या साथीदाराने लाकडी दांडक्याने गुरफानच्या मनगटावर हल्ला केला, ज्यामुळे गुरफानला गंभीर दुखापत झाली.

सदर घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाची नोंद केली. हल्लेखोर मंगेश आणि त्याचे साथीदार सध्या फरार आहेत, आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सुरक्षेची उपाययोजना केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in