
जव्हार तालुक्यातील खरीप हंगाम अतिशय उपयुक्त आहे. याच हंगामातील शेतीतून मिळणारे उत्पन्न वर्षभर येथील शेतकऱ्यांना लाभदायक ठरते आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात येत होती, त्यावेळी लाकडी शेती अवजारांचा व शेतीसाठी उपयुक्त अशा साधनांचा सर्रास वापर करण्यात येत होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात कृषी क्रांतीने बदल घडवून आणला आहे. त्यामुळे सध्या सगळेच शेतकरी हे अत्याधुनिक कृषी अवजारे वापरण्याकरिता अधिक पसंती द्यायला लागले आहेत. यामुळे लाकडी शेती अवजारे वापरण्याला ब्रेक लागत चालला आहे.
शासनाच्यावतीने कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दिवसेंदिवस प्रगती होत असून नवनवीन शेतीविषयक उपयोगी आधुनिक अवजारे निर्मितीवर भर दिला जात आहे. परिणामी शेतीकामासाठी वापरण्यात येणारी लाकडी अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
आधुनिकतेमुळे हाेतेय वेळेची बचत
लाकडी अवजारे बनविण्यासाठी लागणारे लाकूड, मजुरी, मोडतोड झाल्यावर दुरुस्तीला लागणारा वेळ यामुळे अधिक वेळ खर्च होत असतो. बैलजोडीचा सांभाळ करणेही अवघड होत आहे. बैलजोडीच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने मशागतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मातीत पेरणीच्या वेळी शेतात चालणारी लाकडी तिफन आता नजरेआड झाली आहे. अलीकडे आधुनिक कृषी अवजारे व यंत्रसामग्रीचा वापर अधिकाधिक होत आहे. पूर्वी बैलजोडी व लाकडी अवजारांच्या सहाय्याने शेतीची कामे केली जायची. मात्र आता शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेतीकामे करीत आहेत. शेती कामासाठी ट्रॅक्टर व आधुनिक यंत्रासह लोखंडी अवजारांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. बैलजोडीच्या सहाय्याने शेतीची मशागत करणे हे चित्र दिवसेंदिवस दिसेनासे होत आहे. लाकडी नांगर, वखर, तिफन, पट्टा, फण आदी अवजारे काळ्या मातीतून काढता पाय घेऊ लागली आहेत. त्यांच्या जागी अनेक नवीन अवजारे आली असून या अवजारांमुळे काम अधिक जलत गतीने हाेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे. तसेच शेतीच्या उत्पन्नात वाढ हाेत असल्याने शेतकरी वर्गाचा याच अवजारांचा वापर करण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे.