
ठाणे : अनधिकृत तीन दुकानांचे गाळे हटविण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे, खाजगी इसम ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांना ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी सोमवारी न्यायालयीन (जेल) कोठडी सुनावली.
दरम्यान, या तिघांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावरील सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे. नौपाड्यातील तीन दुकानांचे गाळे हटविण्यासाठी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडून २५ लाखांच्या लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना पाटोळे आणि गायकर यांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांना सुरुवातीला दोनदा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. दरम्यान, सुशांत सुर्वेला अटक करून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी या तिघांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना एकत्रच ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्यासमोर हजर करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरकारी वकील संजय लोंढे यांनी सरकारी बाजू मांडली, तर पाटोळे यांचे वकील विशाल भानुशाली यांनी बाजू मांडली.
बुधवारी जामीनावर सुनावणी
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिघांच्या वकिलांनी जामीन मिळावा यासाठी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायाधीश शिंदे यांनी या अर्जावर सुनावणी येत्या बुधवारी (ता. ८) होईल, असे स्पष्ट केले. यावेळी पाटोळे यांचे वकील विशाल भानुशाली यांनी मंगळवारीच सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली होती; मात्र न्यायालयाने बुधवारी सुनावणी होणार असल्याचे ठाम सांगितले.