आदिम जमातीच्या नागरिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार

तालुक्यात शासकीय जागा उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी १९ घरकुले बांधण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आहे
आदिम जमातीच्या नागरिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार

पालघर जिल्ह्यातील आदीवासी समाजातील आदिम जमात म्हणजेच कातकरी नागरिकांना एकत्र बसवून तेथे त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करून त्यांचे जीवनमान उंचावणे असा महत्वाकांक्षी प्रकल्प जव्हार तालुक्यात सुरू आहे, प्रकल्पामुळे आदिम जमात नागरिक एकत्र येऊन त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे.

तालुक्यात शासकीय जागा उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी १९ घरकुले बांधण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. या वस्तीत असणाऱ्या या घराचे क्षेत्रफळ हे ३६० इतके आहे. एक हॉल, स्वयंपाकघर व एक खोली असे त्याचे स्वरूप आहे. घराला रंगरंगोटी, पाण्याची सुविधा, शौचालय, रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी रोटरी क्लब व एनजीओ मदत करणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, पंचायत समितीचे सभापती सुरेश कोरडा यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी समीर वाठारकर, आवास विभागाचे विस्तार अधिकारी यशवंत पराते आदींनी यासाठी पाठपुरावा केला.

जव्हारमध्ये एक लाख पन्नास हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. बांधकाम करताना मस्तान नाका, मनोर, वाडा येथून वीट मागवावी लागते. त्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील वस्तीची अधिक होतो. वस्तीजवळ शासकीय जागा वैशिष्ट्ये उपलब्ध असल्याने या कुटुंबीयांना वीटभट्टी व्यवसाय उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. मानवी विकास आयोगाकडे प्रस्ताव पाठवल्यावर आयुक्तांनी जातीने पाहणी करत सकारात्मक निर्णय घेत हिरवा कंदील दिला. वीट कशी तयार करावी याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून व्यवसायासाठी भांडवल देखील दिले जाणार आहे; तर दुग्धव्यवसायाला चालना देत १९ कुटुंबीयांना प्रत्येकी एक हजार रुपये दिले जाणार आहेत. याचबरोबर या ठिकाणी काजूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे; मात्र प्रक्रिया केंद्र नाही, त्यामुळे पंचायत समितीने काजू प्रक्रिया केंद्राच्या निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे. महिला बचत गट तयार करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in