
कुळगाव बदलापूर नगर पालिकेत राष्ट्रवादीचे दोनच नगरसेवक होते. परंतु पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे २० नगरसेवक निवडून येतील, नगराध्यक्षही राष्ट्रवादीचा असेल, असा दावा करून यंदाच्या निवडणुकीत पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केला.
कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (ता.७) बदलापुरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात दामले यांनी हा दावा केला. सध्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे सांगून लवकरच बदलापुरातील काही राजकीय दिग्गज राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत दामले यांनी दिले. हे दिग्गज कोणत्या पक्षातील असतील हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मात्र काही माजी नगरसेवकांना शिवसेनेत राहू, शिंदे गटात जाऊ की राष्ट्रवादीत जाऊ, असा प्रश्न पडला असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कुणी दादागिरी केल्यास खपवून घेतले जाणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दामले यांनी दिला.ताईज किचन, दादास जिम, साहित्य गौरव ग्रंथालय, शारदा गिरणी , यशस्विनी भवन अशा अनेक लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादी दररोज सुमारे १५०० लोकांपर्यंत पोहचत असल्याचे दामले यांनी सांगितले. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाचा राष्ट्रवादीचा बदलापूर पॅटर्न राबवून शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेली कामे करू असे आवाहन दामले यांनी कार्यकर्त्यांना केले. संघटना केंद्रस्थानी ठेवून एकसंघ राहिल्यास आणि एक विचाराने, एका दिशेने काम केल्यास येणारा काळ राष्ट्रवादीचा असेल, असा विश्वासही दामले यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, दशरथ तिवरे, कालिदास देशमुख, विद्या वेखंडे, सदाशिव पाटील, शैलेश वडनेरे,अविनाश देशमुख, प्रभाकर पाटील, डॉ.अमितकुमार गोइलकर, दिनेश धुमाळ, राम लिये आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.