कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी पाच जणांवर गुन्हा; माजी नगरसेवकासह पदवीधर उमेदवाराचा समावेश

भिवंडी-निजामपूरा शहर महानगर पालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबीयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करीत तपासाअंती ५ जणांवर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी पाच जणांवर गुन्हा; माजी नगरसेवकासह पदवीधर उमेदवाराचा समावेश
प्रातिनिधिक फोटो
Published on

भिवंडी : भिवंडी-निजामपूरा शहर महानगर पालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबीयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करीत तपासाअंती ५ जणांवर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदारकीच्या उमेदवाराचा यामध्ये समावेश असल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सिद्धेश्वर मोगलप्पा कामूर्ती (६४), पत्नी कावेरी कामूर्ती (६२), श्रीकांत कामूर्ती (३६), संकेत कामूर्ती (३५), निशिकांत कामूर्ती (३२) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून श्रीकांत कामूर्ती हे कोकण पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

विशेष म्हणजे आज २६ जून रोजी या कोकण मतदारसंघात मतदान होत असल्याने मतदारांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर कामूर्ती हे भिवंडी शहरातील तेलीपाडा परिसरात कुटुंबासह राहत असून त्यांच्या बेकायदा अपसंपदेच्या चौकशीची कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली होती. या चौकशीदरम्यान या निरीक्षणामध्ये त्यांचे एकत्रित उत्पन्न ७ कोटी ४४ लाख २० हजार १६४ रुपये असून त्यांचा एकत्रित खर्च ४ कोटी ३७ लाख ८६ हजार ८५६ रुपये व एकत्रित मालमत्ता ५ कोटी २० लाख ६७ हजार ४२ रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

दरम्यान सिद्धेश्वर कामूर्ती यांची एकत्रित मालमत्ता व खर्च यांची बेरीज केली असता ती ९ कोटी ५८ लाख ५३ हजार ८९८ रुपये असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कामूर्ती यांच्या उत्पन्न ७ कोटी ४४ लाख २० हजार १६४ मधून एकत्रित मालमत्ता व खर्च ९ कोटी ५८ लाख ५३ हजार ८९८ रुपये वजा केले असता, त्यांनी १ जानेवारी १९८५ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत २ कोटी १४ लाख ३३ हजार ७३४ रुपये म्हणजेच २९ टक्के एवढी अपसंपदा गैरमार्गाने जमा केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक स्वप्निल तुळशीदास जुईकर यांच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर कामूर्ती यांच्यासह ५ जणांवर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास जाधव करीत आहेत.

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश

विशेष म्हणजे यातील आरोपी श्रीकांत कामूर्ती हे कोकण पदवीधर निवडणूक लढवत असल्याने ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे, तर दुसरीकडे मुख्य आरोपी असलेले सिद्धेश्वर कामूर्ती यापूर्वी भाजपचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष होते. मात्र पक्षात कुरबुरी वाढल्याने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. एकंदरीतच कामूर्ती कुटुंबावर कोट्यवधींचा गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in