जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; प्रभू श्रीरामचंद्रांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथे झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविरोधात आक्षेपार्ह विधान केले
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; प्रभू श्रीरामचंद्रांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने प्रभू श्रीरामचंद्रांविरोधात आमदार आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केले असल्याची तक्रार भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश महिला संयोजिका सेजल संजय कदम यांनी पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथे झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या वक्तव्यामुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकारी सेजल कदम यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करून पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम २९५ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, राज्यातील काही शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रथमच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रामलल्लाने आव्हाडांना धडा शिकविला -सेजल कदम

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला, ही खूप आनंदाची बाब आहे. हा सर्व श्रीराम भक्तांचा विजय असून, रामलल्लाने आव्हाडांना धडा शिकविला आहे. त्यातून त्यांनी योग्य समज घ्यावी. या प्रकरणात असंख्य हिंदू बंधू-भगिनींनी मला आव्हाडांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यांचे मी आभार मानते. या प्रश्नावर ठाणे शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन हिंदू धर्मीयांच्या भावनांचा सन्मान केला, याबद्दल वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची आभारी आहे. यापुढील काळातही हिंदूंच्या देव-देवतांविरोधात विधाने करणाऱ्यांना आम्ही भाजपच्या वतीने कायदेशीर मार्गाने धडा शिकविणार आहोत, अशी प्रतिक्रिया सेजल कदम यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in