काजू-आंबा लागवड आगीत भस्मसात

मोखाडा तालुक्यातील मौजे आडोशी येथील शेतकरी भगवान अर्जुन पाटील यांच्या शेतात विद्युत लाईनमुळे आग लागली होती.
काजू-आंबा लागवड आगीत भस्मसात

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील मौजे आडोशी येथील शेतकरी भगवान अर्जुन पाटील यांच्या शेतात विद्युत लाईनमुळे आग लागली होती. या आगीमध्ये आंबे २५, १५० काजू, ५० ते ६० सागाची झाडे त्याशिवाय इतर अशी २५० झाडे जळून भस्मसात झाली आहेत. शिवाय पाइपलाईन देखील जळाली आहे. या आगीत पाटील यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती मिळाली असता, मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थिती जाणून घेतली. याबाबतची माहिती तहसीलदार, कृषी विभाग व महावितरणच्या अधिकाऱ्यांना वाघ यांनी दिली असून, तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी देखील केली आहे. मोखाडा तालुक्यात सन १९७० च्या दशकात विद्युत वाहिनी टाकलेली आहे. दरम्यानच्या अवधीत किरकोळ दुरुस्ती सोडली, तर कुठेही भरीव प्रमाणात विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे हलक्या वाऱ्यातही वाहिन्या तुटणे, विद्युत पुरवठा खंडित होणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे वास्तविक परिस्थितीचे सर्वेक्षण करून विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण करणे, कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठिकठिकाणी आणखी विद्युत रोहित्रांचे नियोजन करणे ही तातडीची कामे महावितरणने हाती घेण्याची मागणीही वाघ यांनी महावितरणकडे केलेली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in