उरणवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

उरण शहराच्या कक्षा रुंदावू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उरणवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
PM

उरण : शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करण्यात येणार असून, त्यासाठी उरण पोलिसांनी ठिकाणे निश्चित केली आहेत. शहरात यासाठी ८५ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी कन्ट्रोल रूमही बनविण्यात येणार असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे. याकरिता ओएनजीसीकडून सहकार्य मिळणार आहे.

उरण शहराच्या कक्षा रुंदावू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; मात्र त्याची देखभाल दुरुस्ती वेळेत न झाल्याने ते निकामी झाले आहेत. उरण शहरातील वाढता बाजार आणि त्यामुळे होणारी गर्दी या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटना यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे शहरातील गुन्ह्याच्या तपासात ही सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भविष्यातही उरणची लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे. याचा विचार करून उरण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत करण्यात येणार आहेत. ओएनजीसी प्रकल्पाच्या सहकार्याने उरण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी शहरातील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शहरात एकूण ८५ कॅमेरे बसविण्यात येणार असून, लवकरच हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. त्याचप्रमाणे यामुळे शहरातील सुरक्षा ठेवण्यात मदत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in