महापालिकेच्या शाळांवर आता सीसीटीव्हीचा वॉच; १२९ शाळेत ९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार

ठाणे महानगरपालिका शाळांमधील बालसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने आता शाळांना सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच बसवण्याचा निर्णय घेतला असून ९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिका शाळांमधील बालसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने आता शाळांना सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच बसवण्याचा निर्णय घेतला असून ९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची त्यातही विद्यार्थींनीची सुरक्षा करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार आता महापालिकांच्या १२९ शाळांमध्ये ९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्या संदर्भातील निविदा महापालिकेने काढली आहे. यासाठी सुमारे अडीच कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

बदलापूर येथील शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच शाळेत सीसीटीव्हींचे जाळे नसल्याचा मुद्दा देखील चर्चेला आला होता. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून यापूर्वी २६० सीसीटीव्ही कॅमेरे शाळेत बसविण्यात आले आहेत. परंतु ते कॅमेरे हे शाळेच्या एन्ट्री आणि एक्सीट पॉर्इंटवर बसविण्यात आलेले आहेत. ठाणे महापालिकेच्या ७७ इमारतींमध्ये १०६ प्राथमिक आणि २३ माध्यमिक अशा एकूण १२९ शाळा असून त्याठिकाणी २८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानुसार आता या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवला जाणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडणाऱ्या चुकीच्या घटनांबाबत राज्य सरकाराने पावले उचलली आहेत. त्यामाध्यमातून शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून आता ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. १२९ शाळांमध्ये आता ९५० कॅमेरे बसविले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण हे शाळेतील मुख्याध्यांपकांच्या ताब्यात ठेवले जाणार आहे.

याठिकाणी बसविले जाणार कॅमेरे

यापूर्वी शाळांच्या येण्या आणि जाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच २६० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु आता शौचालयाच्या परिसरात बाहेरील ठिकाणी, मैदान, वंराडा, पॅसेज, जिन्यावर याशिवाय इतर महत्वांच्या ठिकाणी कॅमेरे बसविले जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in