ठाणे, डोंबिवली प्लॅटफॉर्मच्या विस्ताराकरिता आज ब्लॉक; काही गाड्या रद्द करण्यात येणार
मुंबई : मध्य रेल्वेद्वारे १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्मच्या विस्ताराकरिता शनिवार मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या ब्लॉक कालावधीत काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेमार्फत १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ आणि डोंबिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ए, १ व २ यांच्या विस्तारासाठी शनिवारी रात्री एक विशेष 'ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक' घेणार आहे. मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली दरम्यानअप व डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल.
ब्लॉक कालावधीत काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री १०.४९ वाजता परळ येथून सुटणारी लोकल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.१२ पासून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा तसेच विद्याविहार येथून रविवारी सकाळी ४.४५ वाजता सुटणाऱ्या ते ९.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे ठाणे स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. याव्यतिरिक्त काही डाऊन धीम्या सेवा दिवा स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार असून त्या कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.
तर शनिवारी रात्री ११.२६ ते ११.५२ या वेळेत आणि रविवारी पहाटे ३.२३ ते ९.५५ या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या 'अप धीम्या' मार्गावरील गाड्या कल्याण येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. पुढे दिवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान या गाड्या पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. तसेच ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरील पुढील गाड्यांना अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरही थांबतील. तर रविवारी डोंबिवली येथे समाप्त होणाऱ्या किंवा तिथूनच सुरू होणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत, मुलुंड-ठाणे आणि दिवा-कल्याण या स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन दिशेकडील सर्व उपनगरीय गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत मेल आणि एक्सप्रेस गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
विविध अभियांत्रिकी आणि दुरुस्तीची कामे पार पाडण्यासाठी मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. ठाणे आणि वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि 'डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी, नेरुळ, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन' मार्गावरील सेवा, तसेच पनवेल, नेरुळ, वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

