आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसह भाविकांची पावले विठूमाउलींच्या ओढीने पंढरपूरकडे केव्हाच निघाली आहेत, मात्र शाळा तोंडावर येऊ घातलेली परीक्षा आणि अभ्यासाच्या दडपणात मागे राहिलेल्या चिमुकल्यांनाही विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यांना प्रत्यक्ष तिथे पोहोचता येता येणार नसले, तरी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढून विठ्ठलनामाचा जयघोष करत त्यांनी त्यांचा भक्तिभाव विठुरायापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
जव्हार शहरातील देवस्थान समिती व विठ्ठल रखुमाई मंदिर समिती च्यावतीने सुरुवातीला विठ्ठलाचे पूजन करून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करण्यात आला. शहरात भव्य टाळ मृदंगाच्या गजरात,मोठ्या भक्ती भावाने अभंग गात मिरवणूक काढण्यात आली. २०० नागरिकांनी यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
जव्हार शहरातील शाळांमध्ये बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच वेळी आले असल्याने सर्वात शाळांमध्ये बालक-बालिकांनी अतिशय विलोभनीय असा पारंपारिक पोशाख करून सामाजिक एकतेचे दर्शन घडविले, शिवाय ईद साठी गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या तर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रखुमाई यांच्या पोशाखातील बालकांनी पंढरीचे वातावरण जव्हारमध्ये निर्माण करण्यात कसलीही बाकी ठेवली नव्हती.
शालेय विद्यार्थ्यांनी या संकल्पनेत सहभागी होऊन, हार फुलांनी सजवलेली पालखी बनविली होती. यात मुलांनी टाळ वाजविले, तर कोणी विद्यार्थ्यांनी विठुरायाचा जयघोष केला. चंद्रभागेच्या तीरी, विठ्ठल झाला, विठ्ठलनामाची शाळा भरली, अवघे गरजे पंढरपूर अशी गाणी, अभंग, भजन असे गीत मुलांना ऐकवण्यात आले.
हर्षद मेघपूरिया - युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल,जव्हार