मुरबाडमध्ये छोटा गांधी अवतरला

मुरबाडमध्ये चक्क गांधीजींचा वेष परिधान करून एक लहान मुलगा अन्नाच्या शोधात म्हसा यात्रेत फिरत असल्याचे दिसून आले आहे.
मुरबाडमध्ये छोटा गांधी अवतरला
Published on

नामदेव शेलार/मुरबाड : पोटाची खळगी भरण्यासाठी कोण काय रूप घेईल याचा अंदाज व्यक्त करता येत नाही. लहान मुले आपली पोटाची भूक भागवण्यासाठी रस्त्यावर भीक मागतानाचे चित्र आजपर्यंत महाराष्ट्रात कायम आहे. त्यातच मुरबाडमध्ये चक्क गांधीजींचा वेष परिधान करून एक लहान मुलगा अन्नाच्या शोधात म्हसा यात्रेत फिरत असल्याचे दिसून आले आहे.

अशाच एका लहान बालकाने पोटाची खळगी भरण्यासाठी शरीराला सिल्वर कलर फासून फक्त लंगोटी आणि गांधीजींचा चष्मा, एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात डब्बा घेऊन म्हसा यात्रेत लोकांसमोर हात पसरवत जगण्यासाठी कुणीतरी मदत करा अशी याचना करत असून महात्मा गांधींची वेशभूषा पोटाला दोन रुपये, दहा रुपये मिळवून देत आहे.

त्याच पैशातून मजबुरीचा गांधी उघड्यावरचे अन्न खाऊन पोट भरत असल्याचे भयानक वास्तव म्हसा यात्रेत पाहण्यास मिळत आहे. एका बाजूला महात्मा गांधींचे सोंग तर दुसऱ्या बाजूला डोंबाऱ्याची दोरीवरची कसरत यामधून पोट भरण्यासाठी कोणताही पर्याय वाईट नसल्याचे सांगितले जात आहे. कोणी पोटावर चापक्याने फटके मारून दोन रुपये मागतो, कोणी तारेच्या गोळामधून दोन लहान मुले एकाच वेळी बाहेर पडतात कोणी मजबुरीचा गांधी बनतो तर कोण दोरीवर चालून डोंबाऱ्याचा खेळ दाखवून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसमोर पोटासाठी हात पसरवतो एवढी श्रीमंती महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात म्हसा यात्रेत दिसून आली. ही परिस्थिती सर्वत्र आहे, आयुष्याचे दारिद्र्य संपविण्यासाठी लाखो हातांमधून तुटपुंजे हात पुढे येतात. उगवत्या सूर्याच्या तळपत्या उन्हात मावळत्या चंद्रमाच्या उजेडात मजबुरीचा नाम महात्मा गांधी तेवित आहे.

logo
marathi.freepressjournal.in