
इतिहासात प्रथमच ठाण्याला लोकनेते एकनाथजी शिंदे यांच्या रूपात मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला आहे. यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी, १३ ऑगस्ट रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
शनिवारी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराबरोबरच, त्यांची प्रकट मुलाखत, गौरवग्रंथाचे प्रकाशन, गौरवगीताचे सादरीकरण होणार आहे, तसेच सोहळ्याआधी मुख्यमंत्र्यांच्या भव्य मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘मुख्यमंत्री जनगौरव समिती’चे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली. ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दिडशेहून अधिक संस्थांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा जाहीर नागरी सत्कार करण्यात येत आहे.
ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास ठाण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबरच नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण हेही अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येईल.