मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा; गंभीर बाब नसल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मंगळवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत कोणत्याही प्रकारची गंभीर बाब नसल्याचा निर्वाळा ज्युपिटरच्या डॉक्टरांनी दिला आहे. या तपासणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुंबईमधील वर्षा निवासस्थानी रवाना झाले.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेएक्स
Published on

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मंगळवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत कोणत्याही प्रकारची गंभीर बाब नसल्याचा निर्वाळा ज्युपिटरच्या डॉक्टरांनी दिला आहे. या तपासणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुंबईमधील वर्षा निवासस्थानी रवाना झाले.

राज्यात एकीकडे महायुतीच्या वतीने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना तसेच मुख्यमंत्री कोण? अशा चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मात्र प्रकृती बिघडल्याने मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याच्या निवासस्थानी विश्रांती घेत होते. मंगळवारी दुपारपर्यंत ते आपल्या निवासस्थानी आराम करत होते. त्यानंतर दुपारी दीडच्या दरम्यान ते वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. सुमारे दोन ते अडीच तास मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि घशाला संसर्ग झाला आहे. त्यांना सोमवारी घरीच सलाईन लावण्यात आली होती. भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

मंगळवारी झालेल्या वैद्यकीय तपासणीत या वैद्यकीय अहवालात कोणतीही चिंताजनक बाब नसल्याचे समोर आले. तपासणीनंतर रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: प्रकृती ठीक असल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ते ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी परतले.

सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रीय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवारीही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली.त्यानंतर आता मंगळवारी पुन्हा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर कोणतीही गंभीर बाब नसल्याचे उघड झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in