मराठी सर्वांना एकत्रित ठेवणारा धागा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्व मराठी संमेलनात उद्गार

वर्ल्ड इकॉनोमी फोरमच्या माध्यमातून ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरीत झाले आहेत.
मराठी सर्वांना एकत्रित ठेवणारा धागा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्व मराठी संमेलनात उद्गार

ठाणे : मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे, त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो. या विश्व मराठी संमेलन-२०२४ च्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित येता आले आहे. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नवी मुंबई येथे काढले.

विश्व मराठी संमेलन-२०२४ चा उद्घाटन सोहळा नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले व ते म्हणाले, मराठी भाषा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले होते. विविध परिसंवाद, नाट्य संमेलन, साहित्य संमेलन अशा विविध माध्यमांतून 'माय मराठी'चा गजर सुरू आहे. मराठी भाषेचे महत्व वाढविण्यासाठी याचप्रकारे आयोजित करण्यात आलेला मराठी भाषा पंधरवडाही अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला. मराठी भाषेचा वापर वाढत आहे.

आजच्या पिढीचा कल मराठी भाषेकडे वळविणे गरजेचे आहे मात्र यासाठी मराठी भाषेच्या लेखकांनी आजच्या पिढीची भाषा ओळखून त्याप्रमाणे साहित्य निर्मिती करायला हवी, त्यातून त्यांच्या मनात मराठी भाषेसाठी आपुलकी निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी मराठी भाषा व शालेय शिक्षण तथा मुंबई (शहर) पालक मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, आमदार मंदा म्हात्रे, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, माध्यम सल्लागार जयू भाटकर, मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, राज्य मराठी भाषा कोष मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र देशाचे 'ग्रोथ इंजिन'

वर्ल्ड इकॉनोमी फोरमच्या माध्यमातून ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरीत झाले आहेत. महाराष्ट्र देशाचे 'ग्रोथ इंजिन' आहे. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. आपली अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आली आहे आणि आपले ध्येय आहे ते आपली अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे. प्रधानमंत्री मोदी यांनी मांडलेली पाच ट्रिलियन डॉलर संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. याचमुळे परदेशातील अनेक मराठी उद्योजक आपल्या देशात व महाराष्ट्रातही आपले उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य हे शासन करील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in