घराणेशाही हरली आहे; निकालानंतर उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांची टीका

निकालानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे आनंद आश्रमात जाऊन आशीर्वाद घेतले.
घराणेशाही हरली आहे; निकालानंतर उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांची टीका
Published on

ठाणे : बाळासाहेब होते तोपर्यंत सगळ्या गोष्टी नियमात होत्या, मात्र त्यानंतर मनमानी कारभार सुरू झाला. त्यानंतर असूया निर्माण झाली. अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे कालच्या निर्णयाने दाखवून दिले, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हा निर्णय देताना खरी शिवसेना आमची, असे स्पष्ट केले असले, तरी अपात्रेबाबत निर्णय का का घेतला नाही? यासंदर्भात लीगल टीमशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे, तीच खरी शिवसेना आहे’ असा निर्णय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर दोन्ही गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. या निकालानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे आनंद आश्रमात जाऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, या निकालामुळे बुधवारपासून सर्वत्र जल्लोष सुरू आहे. अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे या निर्णयाने दाखवून दिले. बाळासाहेब, दिघे साहेब यांच्या विचारांचा हा विजय झाला हे या निर्णयाने दाखवून दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जो विश्वास दीड वर्षापासून माझ्यावर दाखवला. त्यासाठी मी धन्यवाद देतो; मात्र या निर्णयामुळे घराणेशाही हरली आहे, अशी टीका देखील मुख्यमंत्र्यानी यावेळी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

सुप्रीम कोर्टात जायचा अधिकार सर्वांना आहे

सुप्रीम कोर्टात जायचा अधिकार सर्वांना आहे, त्यांच्या बाजूने निकाल लागला तर ठीक नाहीतर सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचे काम ते करतील, असा टोला देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. कुठेही गेले तरी मेरिट आमच्या बाजूने आहे, त्यामुळे निकाल आमच्या बाजूने दिला पण अध्यक्षाबाबत जे भाष्य त्यांनी केलं ते खालच्या पातळीचे आहे. त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणार नाही, पण जनता नक्की उत्तर त्यांना देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in