ई-ऑफिस प्रणालीचा नागरिकांना ताप; वेळेच्या खोळंब्यामुळे नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वाद

रांगेत एक दोन तास खोळंबून राहिलेल्या नागरिक आणि कर्मचारी यांच्यामध्ये खटके उडत असून अनेक वेळा वादाला आमंत्रण मिळत आहे. काही नागरिकांनी तर हाच गतिमान कारभार असेल तर जुन्याच प्रणालीनुसार कारभार करा, असा सल्ला देखील पालिका प्रशासनाला दिला आहे.
TMC
TMC
Published on

ठाणे : मोठा गाजावाजा करत ठाणे महापालिकेत सुरू करण्यात आलेल्या ई-ऑफिस प्रणालीचा नागरिकांना भलताच ताप झाला आहे. रांगेत एक दोन तास खोळंबून राहिलेल्या नागरिक आणि कर्मचारी यांच्यामध्ये खटके उडत असून अनेक वेळा वादाला आमंत्रण मिळत आहे. काही नागरिकांनी तर हाच गतिमान कारभार असेल तर जुन्याच प्रणालीनुसार कारभार करा, असा सल्ला देखील पालिका प्रशासनाला दिला आहे.

शासकीय कार्यालयातील दैनंदिन कामकाज सुलभ, पारदर्शक व गतिमान पद्धतीने कामे व्हावीत, यासाठी १ एप्रिलपासून ठाणे महापालिकेत ई-ऑफिस कार्यप्रणालीची सुरुवात करण्यात आली. ही प्रणाली उत्तम असली तरी एखादा अर्ज किंवा निमंत्रण द्यायचे झाल्यास येणाऱ्या नागरिकाला त्यासाठी रांगेत उभे राहून एक ते दीड तासाचा अवधी जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यातही तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून रोज किती अर्ज करता, आम्हाला काय एकच काम आहेत का? अशा पद्धतीने बोलून नागरिकांशी हुज्जत घालण्याचे काम करीत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. त्यामुळे ही कार्यप्रणाली चांगली असली तरी देखील ठाणेकरांना वेळ तर वाया जात आहेच, शिवाय कर्मचाऱ्यांकडून त्यांना बोलणी देखील खावी लागत आहेत.

महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या मिशन शंभर दिवस या उपक्रमातंर्गत ई -ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून राबविले जाणारे प्रकल्प, निंमत्रण, अर्ज करायचे झाले तरी देखील आता या ई -ऑफिसचा पर्याय ठाणे महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. तसेच ई -ऑफिस कार्यप्रणालीमुळे कोणत्याही कामाचा प्रस्ताव एक ते दोन दिवसात मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शिवाय या कामामध्ये सुसूत्रता व पारदर्शकता देखील राहणार आहे. तसेच प्रत्येक प्रस्तावाला ई-नंबर दिला जाणार असून संबंधित प्रस्ताव कोणत्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर आहे किंवा त्यास विलंब झाला याचे देखील ट्रेकिंग ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणेकरांना देखील एखादा अर्ज करायचा झाल्यास त्यासाठी देखील या प्रणालीचा वापर केला जात आहे.

परंतु जेव्हापासून ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे, तेव्हापासून ठाणेकरांचा वेळ मात्र मुख्यालयात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातही एक अर्ज किंवा साधे निमंत्रण जरी द्यायचे झाले तरी देखील त्यासाठी रांगेत एक ते दीड तास उभे रहावे लागत आहे.

दुसरीकडे मनसेचे संतोष निकम हे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात गेले असता, त्यांचा पाऊण तासाहून अधिकचा वेळ रांगेत गेलाच, शिवाय त्यांनी कर्मचाऱ्यांकडून देखील चुकीची वागणूक मिळाली आहे. सारखे अर्ज करून तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात, किती अर्ज करणार आम्हाला काय तेच काम आहे का?, त्यातही संबधींत कर्मचाऱ्याला नाव विचारले असता ते तर सांगितले नाहीच, शिवाय त्याच्या गळ्यात ओळखपत्र देखील नसल्याचे दिसून आले आहे. तसेच यावेळी सुरक्षारक्षांकरवी शारीरिक बळाचा वापर करून धमकावण्याचा प्रयत्न देखील झाल्याची बाब दिसून आली आहे. या संदर्भात त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.

या ठिकाणी काम करण्यासाठी एकच कर्मचारी
ई -ऑफिस प्रणालीचे काम करण्यासाठी याठिकाणी तीन संगणक, प्रिंटर असले तरी त्याठिकाणी काम करण्यासाठी एकच कर्मचारी असल्याचा दावा यावेळी निकम यांनी केला आहे. त्यामुळे आलेले प्रत्येक पत्र घेऊन ते स्कॅन करून संबधीत विभागाकडे पाठविण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे पाच ते सात मिनिटांचा कालावधी जात आहे. त्यामुळे रांग देखील वाढत असल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले आहे.
logo
marathi.freepressjournal.in